शैक्षणिक सहलीसाठी शाळा नाखूष

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

पिंपरी - शैक्षणिक सहलीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास मुख्याध्यापक, प्राचार्यांनाच जबाबदार धरण्यात येईल, असा फतवा पुणे विभागाच्या शिक्षण उपसंचालकांनी काढल्याने ‘सहल नको रे बाबा’ म्हणण्याची वेळ मुख्याध्यापकांवर आली आहे. त्यामुळे यावर्षी केवळ ३३ शाळांनीच सहलीचे प्रस्ताव पाठवले आहेत.

पिंपरी - शैक्षणिक सहलीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास मुख्याध्यापक, प्राचार्यांनाच जबाबदार धरण्यात येईल, असा फतवा पुणे विभागाच्या शिक्षण उपसंचालकांनी काढल्याने ‘सहल नको रे बाबा’ म्हणण्याची वेळ मुख्याध्यापकांवर आली आहे. त्यामुळे यावर्षी केवळ ३३ शाळांनीच सहलीचे प्रस्ताव पाठवले आहेत.

शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांकडून दर वर्षी जानेवारी महिन्यात शैक्षणिक सहली काढण्यात येतात. गेल्या वर्षी १४४ शाळांनी सहलीबाबत प्रस्ताव पाठवले होते. मात्र, यंदा नियमावलीतील जाचक अटींची पूर्तता करता करताच मुख्याध्यापकांची पुरती दमछाक होत असल्याने केवळ ३३ शाळांनीच शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठवले आहेत. अर्ध्याहून अधिक शाळांनी विद्यार्थ्यांचे पैसे परत करून शैक्षणिक सहलीच रद्द केल्या आहेत. त्याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांच्या मुलांना बसत आहे.

सहली दरम्यान होणाऱ्या अपघातांचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षण विभागाने सहलीसाठी २७ नियम घालून दिले आहेत. त्यात अप्रत्यक्षरीत्या मुख्याध्यापक व प्राचार्यांनाच जबाबदार धरण्यात आले आहे. परिवहन मंडळाचा परवाना, पालकांचे व विद्यार्थ्यांचे हमीपत्र, सहलीचे एकूण अंतर व कालावधी, विद्यार्थ्यांचा रक्तगट, सहलीसाठी विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र, विद्यार्थ्याचा विमा या कागदपत्रांची पूर्तता केल्यावरच सहल काढण्यात येईल. या कागदपत्रांशिवाय सहल काढल्यास मुख्याध्यापकांवर कडक कारवाई करण्यात येईल, 

असा इशारा शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांनी दिला आहे. त्याबद्दल अनेक मुख्याध्यापकांनी व प्राचार्यांनी नाराजी व्यक्त केली असून, सहलीच रद्द केल्या आहेत. 

‘‘शिक्षण विभागाने शैक्षणिक सहलीसाठी तयार केलेल्या नियमावलीतील जाचक अटींमुळे अनुभूती आणि कृतीतून शिक्षण देण्याचा उद्देश साध्य होऊ शकणार नाही.’’
- नीलेश गायकवाड, मुख्याध्यापक, जिजामाता माध्यमिक विद्यालय, भोसरी 

‘‘नियमानुसार शाळांनी सहलीचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्याने यंदा केवळ ३३ शाळांचे प्रस्ताव आले आहेत.’’
- डॉ. गणपत मोरे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक विभाग) जिल्हा परिषद

सहलीसाठी आवश्‍यक कागदपत्रे
- मुख्याध्यापक-प्राचार्यांचा परवानगीसाठी प्रस्ताव 
- प्रस्तावासोबत मुख्याध्यापक, प्राचार्यांचे हमीपत्र, विद्यार्थ्यांची यादी 
- व्यवस्थापनाच्या परवानगीचे पत्र, आरटीओ पासिंग परवाना 
- पालकांचे व विद्यार्थ्यांचे हमीपत्र, 
- सहलीचे ठिकाण, एकूण अंतर व लागणारा कालावधी 
- विद्यार्थ्यांच्या रक्तगटाची माहिती, त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र 
- विद्यार्थ्यांच्या विम्याची प्रत 

सहलीसाठी स्टॅंप पेपरवर हमीपत्राची मागणी अयोग्य आहे. या नियमावलीतील काही अटी जाचक आहेत. त्यांची सक्ती केल्यास शाळांच्या शैक्षणिक सहलींना भवितव्य राहणार नाही.
- सूर्यकांत भसे, अध्यक्ष पिंपरी चिंचवड मुख्याध्यापक संघ

Web Title: School Unhappy for Educational Trip