मोठी बातमी : 'या' भागातील शाळा सुरु होणार? ऑनलाइन अॅडमिशनला सुरुवात!

School-Lockdown
School-Lockdown

पुणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ग्रीन झोनमधील जिल्हा परिषदेच्या शाळा दरवर्षीप्रमाणे यंदाही १५ जूनलाच सुरू करण्याचे प्राथमिक नियोजन जिल्हा परिषदेने केले आहे. यावर गुरुवारी (ता.२१) होत असलेल्या शिक्षण समितीच्या सभेत शिक्कामोर्तब केले जाणार आहे. त्यानंतर जिल्ह्याधिकारी नवल किशोर राम यांच्या परवानगीनंतर हा निर्णय अंतिम केला जाणार आहे. 

दरम्यान, चालू शैक्षणिक वर्षापासून जिल्हा परिषद शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना सरसकट मोफत गणवेश वाटप केले जाणार आहेत. हे गणवेश आणि मोफत पाठ्यपुस्तकाचा २ लाख ३३ हजार ७२० विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.

पुणे जिल्ह्यात सध्या कोरोना विषाणू संसर्गाचे संकट गडद झाले आहे. यामुळे पुणे जिल्हा हा कोरोना संसर्गात रेड झोनमध्ये आहे. यामुळे मावळत्या शैक्षणिक वर्षाच्या वार्षिक परीक्षा घेता आलेल्या नाहीत. त्यातच नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यासही अवघे तीन आठवडे शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर नवे शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू होणार की नाही, नवीन प्रवेशाचे काय?, मोफत गणवेश आणि पुस्तके वाटपाचे काय आदी प्रश्न निर्माण झाले आहेत. यावर निर्णय घेण्यासाठी येत्या बुधवारी (ता.२१) जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

कोरोनामुळे शाळांना सुट्टी दिल्यामुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरुन काढण्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा गृह अध्यायन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यासाठी वर्गनिहाय विद्यार्थ्यांचे व्हाॅटसप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. या उपक्रमात सध्या सुमारे सव्वा लाख विद्यार्थ्यी (६०.५७ टक्के) सहभागी झाले आहेत. या उपक्रमाला लर्न अॅट होम असे नाव देण्यात आले आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या मदतीने गृह अध्ययन हा उपक्रम सुरू केला आहे. आजअखेरपर्यंत जिल्ह्यातील लिंक 117 केंद्रांनी या उपक्रमाच्या लिंकवर माहिती भरली आहे.

ऑनलाइन प्रवेश सुरू 

दरम्यान, जिल्हा परिषदेने ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी तालुकानिहाय प्रवेश लिंक तयार करुन त्या प्रत्येक पालकांपर्यंत पोहोचविण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे पालकांना मोबाईलवरून घरबसल्या पाल्यांचे प्रवेश घेता येत आहेत. आतापर्यंत इयत्ता पहिलीच्या वर्गाचे १३ हजार ९६० आॅनलाइन प्रवेश पूर्ण झाले आहेत.

पटसंख्येत घटीची शक्यता

पुणे जिल्ह्यात रोजगाराच्या निमित्ताने आलेल्या कामगारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे औद्यौगिक क्षेत्र असलेल्या चाकण, खेड, बारामती, जेजुरी, रांजणगाव, शिक्रापूर आदी भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये कामगारांची मुले लक्षणीय होती. आता कोरोनामुळे ही कुटूंबे आपापल्या मूळ गावी परतले आहेत. त्याचा परिणाम पटसंख्येच्या घटीवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

- जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्या - ३ हजार ७१३.

- झेडपी शाळांमधील एकूण पट - २ लाख ३३ हजार ७२०.

- कार्यरत शिक्षकांची संख्या - ११ हजार ६००.

- एकूण पटापैकी विद्यार्थी - १ लाख १९ हजार ९०१.

- एकूण विद्यार्थिनी - १ लाख १३ हजार ८१९.

- केंद्र व राज्य सरकारच्या मोफत गणवेशाचे लाभार्थी - १ लाख ५३ हजार ९६२.

- जिल्हा परिषदेच्या सेस फंडातील गणवेशाचे लाभार्थी - ७९ हजार ७५८.

पुणे जिल्ह्यात ४६ ठिकाणी कोरोना संक्रमणशील क्षेत्र (कन्टेन्मेंट झोन) आहे. हा सर्व भाग रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे या भागातील शाळा वगळून उर्वरित क्षेत्रातील म्हणजेच ग्रीन झोनमधील शाळा सुरू करण्याचे प्राथमिक नियोजन करण्यात आले आहे. मात्र याबाबतचा निर्णय शिक्षण समितीत घेतला जाईल. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतली जाणार आहे.

- रणजित शिवतारे, उपाध्यक्ष व शिक्षण सभापती, जिल्हा परिषद, पुणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com