हायड्रोजनच्या कमतरतेमुळे थांबते ताऱ्यांची निर्मिती!

एक अब्ज वर्षांत दीर्घिकेतील हायड्रोजन तिपटीने घटला; निरीक्षणातून शिक्कामोर्तब
science and technology Lack of hydrogen stops star formation pune
science and technology Lack of hydrogen stops star formation pune sakal

पुणे : दीर्घिकेतील आण्विक हायड्रोजन कमी झाला म्हणजे ताऱ्यांच्या निर्मितीचा वेग मंदावतो, यावर आता प्रत्यक्ष पुराव्यांनी शिक्कामोर्तब झाले आहे. सुमारे नऊ अब्ज वर्षांपूर्वीच्या दीर्घिकेतील आण्विक हायड्रोजन एक अब्ज वर्षांनी तिपटीने घटल्याचे भारतीय शास्रज्ञांच्या संशोधनातून पुढे आले आहे. पुण्यातील राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्राच्या (एनसीआरए) शास्रज्ञांनी नारायणगाव जवळील अद्ययावत जायंट मिटरव्हेव रेडिओ टेलिस्कोपच्या (यूजीएमआरटी) साहाय्याने ही निरीक्षणे मिळविली आहेत. संशोधक विद्यार्थी आदित्य चौधरी, प्रा. निस्सीम काणेकर आणि प्रा. जयराम चेंगलूरू यांच्या संशोधक गटाने हे संशोधन केले आहे. एक अब्ज वर्षांत प्रचंड वेगाने आण्विक हायड्रोजन कमी झाल्याचे निरीक्षण ‘यूजीएमआरटी’ने नोंदविले आहे. यासंबंधीचे संशोधन नुकतेच अॅस्ट्रोफिजीकल जर्नल लेटर्स या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे.

हे संशोधन महत्त्वाचे का?

दीर्घिकेतील महत्त्वपूर्ण घटक म्हणजे आण्विक हायड्रोजन आणि तारे. ताऱ्यांच्या निर्मितीसाठी आण्विक हायड्रोजन रुपी इंधनाची आवश्यकता असते. एकदा का हायड्रोजन संपला की ताऱ्याची निर्मिती थांबते. जवळपास दोन दशकांपासून हे शास्रज्ञांना माहीत होते. सुमारे आठ ते ११ अब्ज वर्षांपूर्वीच्या दीर्घिकांमध्ये तारा निर्मितीचा वेग आजपेक्षा दहा पटीने जास्त होता. आण्विक हायड्रोजन आणि ताऱ्यांच्या निर्मितीचा दर सुरुवातीच्या काळातील दीर्घिकांचे वर्तन समजून घेण्यास उपयोगी पडणार आहे.

...असे झाले संशोधन

  • अद्ययावत ‘जीएमआरटी’च्या साहाय्याने आठ आणि नऊ अब्ज वर्षांपूर्वीच्या दीर्घिकांतील हायड्रोजनची निरीक्षणे घेतली

  • यासाठी जीएमआरटी-सीएटीझेड १ या सर्व्हेचा वापर

  • एक अब्ज वर्षांच्या कालखंडातील आण्विक गॅसचा तुलनात्मक अभ्यासांती निरीक्षणे

निष्कर्ष

  • नऊ अब्ज वर्षांपूर्वीच्या दीर्घिकेत आठ अब्ज वर्षांपूर्वीच्या दीर्घिकेपेक्षा आण्विक हायड्रोजन तिप्पटीने जास्त

  • आठ अब्ज वर्षांपूर्वीच्या दीर्घिकेत तारा निर्मितीचा वेग मंदावलेला

  • सध्याच्या दीर्घिकांपेक्षा त्या एक अब्ज वर्षांत हायड्रोजन कमी होण्याचा दर सर्वाधिक

ताऱ्यांच्या निर्मितीवेळी वापरलेला आण्विक हायड्रोजन पुन्हा भरून काढण्यास दीर्घिका कमी पडत असल्याचे यातून सिद्ध झाले आहे. म्हणूनच नंतरच्या कालखंडात कमी झालेल्या हायड्रोजनमुळे तारा निर्मितीचा दर कमी होतो. महाकाय दीर्घिकांमध्येही हीच स्थिती असल्याचे आता सिद्ध झाले आहे.

- आदित्य चौधरी, संशोधक, एनसीआरए

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com