बालिशपणा पाकिस्तानच्या अंगलट

बालिशपणा पाकिस्तानच्या अंगलट
Published on

बिश्‍केक, ता. १ (वृत्तसंस्था) : शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेदरम्यान पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) सोशल मीडियावरील त्यांच्या अधिकृत खात्यावरून प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर काही नेत्यांना वगळण्याचा बालिशपणा केला. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या समूह छायाचित्रात पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना केंद्रस्थान देण्यात आले होते. यावरून प्रचंड टीका झाल्यानंतर शरीफ यांनी स्वत:च्या खात्यावरून मोदींचा समावेश असलेले संपूर्ण छायाचित्र प्रसिद्ध करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
बिश्केक येथे आज दहा सदस्य देशांच्या प्रमुखांचे सामूहिक छायाचित्र काढण्यात आले होते. पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या या छायाचित्रात पंतप्रधान मोदी यांच्यासह इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान आणि इतर काही नेत्यांना जाणीवपूर्वक वगळण्यात आले. या सुधारित छायाचित्रात पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ हे मध्यभागी दिसतील, अशा पद्धतीने ते संपादित करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांनी मात्र आपल्या सोशल मीडिया खात्यावरून प्रसिद्ध केलेल्या मूळ छायाचित्रात शरीफ यांच्यासह सर्व नेते दिसत आहेत. पाकिस्तानच्या या कृतीवर सोशल मीडियावरून प्रचंड टीका झाली. मूळ छायाचित्रात शरीफ हे उजवीकडून चौथ्या क्रमांकावर उभे आहेत, मात्र स्वतःला केंद्रस्थानी दाखवण्यासाठी पाकिस्तानने हे छायाचित्र संपादित केल्याचे समोर आले. केवळ छायाचित्रच नव्हे, तर ‘फेसबुक’वरील एका व्हिडिओमध्येही गोलमेज परिषदेच्या दृश्यातून पंतप्रधान मोदींना वगळण्यात आले. केवळ शरीफ यांना मध्यभागी दाखवण्यासाठी पाच जागतिक नेत्यांना छायाचित्रातून हटवण्यात आले, हे अनाकलनीय आहे, अशी टीका पाकिस्तानमधील पत्रकारांनीही केली. नंतर मात्र शरीफ यांनी स्वत:च संपूर्ण छायाचित्र प्रसिद्ध करत सारवासारव केली.
शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांच्याशी संवाद साधला. या तिन्ही नेत्यांनी हस्तांदोलन करत चर्चा केली. याउलट, सामूहिक छायाचित्र झाल्यानंतर शरीफ हे अध्यक्ष पुतिन यांच्याकडे घाईने जाताना दिसले. पुतीन व्यासपीठावरून जात असताना शरीफ हे त्यांना थांबवून संवाद साधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com