येडगाव भागात आठवड्यात दुसऱ्यांदा केबल चोरी; शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत दहा लाख रुपयांचा फटका

रवींद्र पाटे
Saturday, 14 November 2020

येडगाव धरण जलाशयात असलेल्या ५५ कृषी उपसा जलसिंचन योजनेच्या केबल जाळून त्यामधील तांबे धातूची तार अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली. या भागात मागील आठ दिवसात दुसऱ्यांदा केबल चोरी झाली आहे.

नारायणगाव : येडगाव धरण जलाशयात असलेल्या ५५ कृषी उपसा जलसिंचन योजनेच्या केबल जाळून त्यामधील तांबे धातूची तार अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली. या भागात मागील आठ दिवसात दुसऱ्यांदा केबल चोरी झाली आहे. यामुळे येडगाव परिसरातील शेतकऱ्यांचे ऐन दिवाळीत सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती माजी सरपंच गुलाबराव नेहरकर, सतीश नेहरकर यांनी दिली.

हे ही वाचा : Diwali Festival 2020 : शेतक-यांना कोरोनाने मारले तर आता दसरा-दिवाळी सणाने तारले

या बाबत नेहरकर म्हणाले, येडगाव ग्रामपंचायत हद्दीतील इंदिरानगर येथे येडगाव धरण जलाशयात शेतकऱ्यांच्या कृषी उपसा जलसिंचन योजनेचे वीज पंप बसवण्यात आले आहेत. अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास वीज पंपाचा वीज पुरवठा बंद करून ५५ कृषी उपसा जलसिंचन योजनेच्या केबलची चोरी केली. त्यानंतर केबल धरण जलाशयाजवळ जळून त्यातील तांबे धातूची तार चोरुन नेली.

आठ दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी सुमारे ५० कृषी उपसा जलसिंचन योजनेच्या केबलची चोरी याच पद्धतीने केली होती. त्यानंतर प्रति पंप १० हजार रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी नवीन केबलची जोडणी करून कृषी पंप सुरू केले होते. आठ दिवसांत पुन्हा शुक्रवारी दुसऱ्यांदा चोरी झाल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत मोठा भुर्दंड बसला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी माहिती दिल्यानंतर बिट अंमलदार केंगले घटनास्थळी येऊन पहाणी करून गेले. मात्र अद्याप या चोरी बाबत गुन्हा दाखल झाला नाही.

हे ही वाचा : Diwali Festival 2020 : पाच शतकांचा साक्षी असलेल्या कोटाच्या पायऱ्यांवर दीपोत्सव; पांढरीच्या कोटाचा इतिहास पुन्हा उजाळला

येडगावचे सरपंच नरेश नेहरकर म्हणाले,  १४ मे रोजी झालेली गारपीट व तीन जून रोजी झालेले चक्री वादळ याचा सर्वाधिक फटका या भागातील शेतकऱ्यांना बसला आहे. आठवड्यात सलग दोन वेळा केबलची चोरी झाल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत मोठा आर्थिक फटका बसला आहे. पोलिसांनी या चोरीचा तपास करावा, या ठिकाणी सुरू असलेली मासेमारी बंद करावी.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This is the second cable theft in eight days in Yedgaon area