सलग दुसऱ्या दिवशी पाऊस

सलग दुसऱ्या दिवशी पाऊस

पुणे - सलग दुसऱ्या दिवशी पूर्वमोसमी पावसाच्या दमदार सरींनी सोमवारी रात्री पुण्याला झोडपले. येरवडा, बंडगार्डन, वाघोली या नगर रस्त्यावरील भागात पावसाचा जोर जास्त होता, तर डीएसके विश्‍वला दुपारी दमदार पावसाच्या सरींनी हजेरी लावली. पुढील दोन दिवस शहर आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविला आहे. 

शहरात दहा जूनपर्यंत सरासरी ५० मिलिमीटर पाऊस पडतो. दोन दिवसांमध्ये पडलेल्या पूर्वमोसमी पावसाच्या सरींमुळे ३२.५ मिलिमीटर नोंद झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली. शहरात सोमवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत १.६ मिलिमीटर पावसाची नोंद शिवाजीनगर येथील हवामान खात्यात झाली. पण, पूर्व पुण्यातील रेल्वे स्टेशनपासून रात्री साडेआठ वाजता जोरदार पावसाला सुरवात झाली. बंडगार्डन, येरवडा, विश्रांतवाडी, वडगाव शेरी या भागात पावसाच्या जोरदार सरी पडल्या. या भागातील रस्त्यांवरून पावसाच्या पाण्याचे लोंढे वाहत होते. शिवाजीनगर परिसरात मात्र पावसाचा जोर नसल्याने तेथे हा पाऊस मोजला गेला नाही, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. 

पुण्याचा पारा उतरला
पुण्यात रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे कमाल तापमानाचा पारा अंशतः कमी झाला. सोमवारी संध्याकाळी साडेपाचपर्यंत ३५.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. रात्री बहुतांश भागात पाऊस पडला. सोमवारी सकाळी साडेआठपर्यंत किमान तापमानाचा पारा २.६ अंश सेल्सिअसने कमी होऊन २०.५ अंश सेल्सिअस नोंदला गेला. 

विजेचा खेळखंडोबा
शहरात पडलेल्या पहिल्याच पावसाने महावितरणच्या कामांची पोलखोल झाली. रविवारी रात्री अनेक भागातील बत्ती गुल झाली. रात्रभर वीजपुरवठा पूर्ववत होऊ शकला नाहीच, शिवाय सोमवारी दिवसभर विजेचा लपंडाव सुरू असल्याने पुणेकर वैतागून गेले. 

रविवारी वादळामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्या. सर्व पेठा, सिंहगड रस्ता, कात्रज, हडपसर, धनकवडी, शिवाजीनगर, पद्मावती, सातारा रस्ता, कोथरूड, वारजे, कर्वेनगर, औंध यासह शहराच्या बऱ्याच भागातील वीज गायब झाली होती. काही भागात एक दोन तास तर काही भागात रात्रभर वीजपुरवठा खंडित झाला होता. 

सनसिटी येथे सब स्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आनंदनगर व परिसरातील वीज खंडित झाली होती. धायरी फाटा, गारमळा येथे रात्रभर वीज नव्हती, पहाटे साडेचारच्या सुमारास वीजपुरवठा पूर्ववत झाला. तर सोमवारी पुन्हा हडपसर, भेकराईनगर, धायरी, नऱ्हे, कोथरूड, कात्रज येथे वीजपुरवठा वारंवार खंडित होत होता. सनसिटी येथील सबस्टेशनचे काम पूर्ण न झाल्याने सोमवारी सायंकाळी पाचपासून आनंदनगर भागात वीज नव्हती. 

वीज गायब, उद्योग ठप्प 
नऱ्हे, धायरी परिसरात दोन दिवसांपासून वीज गायब झाल्याने नागरिकांसह लघुउद्योजक हैराण झाले होते. या भागातील एक हजारपेक्षा जास्त उद्योगांमधील काम विजेविना ठप्प झाले. कामगारांनाही काम नसल्याने ते बसून होते. डीएसके विश्व येथील वीज उपकेंद्रातील फिडरमध्ये बिघाड झाल्याने परिसरातील वीज गायब झाली. त्यामुळे विजेच्या पाच ते सहा मुख्य वीज वाहिन्या बंद पडल्या. सोमवारी रात्री नऊनंतरही या भागातील वीज गेली होती. 

पावसामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणने मुख्य फिडरमधून वीजपुरवठा सुरू ठेवला होता. पण, लघुदाब वाहिन्यांत बिघाड झाल्याने वीज गेली होती. रात्रभर काम करून अनेक ठिकाणी दुरुस्ती केली. तसेच सनसिटी सब स्टेशन येथे बिघाड झाला आहे. तेथे दुरुस्तीचे काम सुरू आहे. 
- निशिकांत राऊत, जनसंपर्क अधिकारी, महावितरण

खडकवासला धरण परिसरात पाऊस सुरू 
खडकवासला : खडकवासला धरणाच्या साखळीतील चारही धरणांत रविवारी पावसाला सुरवात झाली. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संध्याकाळी तीन तासांत मुसळधार पाऊस पडला. सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत टेमघर परिसरात पाऊस झालाच नाही. खडकवासला धरणात १३ मिलिमीटर, पानशेत धरणात सहा मिलीमीटर, तर वरसगाव धरणात सात मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत टेमघर येथे ३० मिलिमीटरपर्यंत सर्वात जास्त पाऊस पडला. वरसगाव येथे २८ मिलिमीटर, पानशेत येथे २७ मिलिमीटर तर खडकवासला येथे २४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. चारही धरणांत मिळून ३.११ टीएमसी म्हणजे १०.६५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. टेमघर धरणाच्या भिंतीच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे, या धरणात सध्या शून्य टक्के पाणीसाठा आहे. वरसगावमध्ये सहा टक्के, पानशेतमध्ये १५ टक्के तर खडकवासला धरणात ३७.६७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com