इंदापूरचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी नकाशा घेऊनच भरणेमामा लढवतायेत किल्ला  

indapur
indapur

वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाण्याच्या प्रश्‍नासाठी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे अॅक्टिव्ह मोडमध्ये असून, त्यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयामध्ये अधिकाऱ्यांची तातडीने दुसरी बैठक घेतली.

इंदापूर तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा, २२ गावातील पाण्याचा, लाकडी- निंबोडी उपसा सिंचन योजनेचे प्रश्‍न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. प्रत्येक विधानसभेची निवडणूक पाण्याच्या प्रश्‍नावर गाजली आहे. आजपर्यंत झालेल्या निवडणुकीमध्ये पाणीप्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन देण्यात आली होती. गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक उन्हाळ्यामध्ये कालव्याच्या पाण्यासाठी व नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांना संघर्ष केला आहे. रास्ता रोको, उपोषणासारखी आंदोलने करून पाणी मिळविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पाणी न मिळाल्यामुळे हजारो एकरातील पिके जळून गेल्याचा इतिहास आहे. 


तालुक्यातील शेती व पिण्याचे पाण्याचे प्रश्‍न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी उजनीतून उचल पाणी योजना, लाकडी- निंबोडी उपसा योजना, नीरा नदीवरील खोरोचीमध्ये नव्याने बॅरेजेस बांधल्यास तालुक्यातील पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरुपी सुटून सिंचन क्षेत्रामध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे. सध्या राज्यामध्ये महाविकास आघाडीचे राज्यमध्ये सरकार असून, भरणे हे राज्यमंत्री आहेत.  राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये जलसंपदा विभाग असून, उपमुख्यमंत्री अजित पवार असल्याने भरणे यांनी इंदापूरच्या पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी आघाडी घेतली आहे. 

अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता. २६) झालेल्या बैठकीनंतर भरणे यांनी शुक्रवारी (ता. २८) तातडीने जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांची दुसरी बैठक घेऊन प्रकल्पांचा आढावा घेऊन सर्व ठिकाणच्या नकाशाची पाहणी केली. तसेच, योजनेतील तांत्रिक अडचणी दूर करून तत्काळ कामे करण्याचे आदेश दिले आहे. तसेच, सर्व्हेक्षण करण्यासाठी निधीची तरतुद केली असून, पाण्याच्या योजना मार्गी लागणार लागण्यास मदत होणार आहे. या बैठकीला जलसंपदा खात्याचे सचिव  घानिकर, जलसंपदा खात्याचे सहसचिव अतुल कपोले, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक विलास रजपूत, जलसंपदा पुणेचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता संजीव चोपडे, धीरज साळी, कार्यकारी अभियंता विजय पाटील, संजय बोडके आदी उपस्थित होते.  

इंदापूर तालुक्यासाठीच्या पाणी योजना  

उपसा सिंचन योजना 
उजनी जलाशयातील पाणी उपसा सिंचन योजनेद्वारे शेटफळगढे येथील खडकवासला कालव्यामध्ये टाकून इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीचे पाणी देणे. त्यासाठी उजनी बॅकवॉटर क्षेत्रामध्ये बॅरेजेस उभारण्यात येणार असून, त्याचे तत्काळ सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला आहे.

शेटफळ तलावाची उंची वाढविणे 
इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली तलाव हा शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. या तलावाची उंची वाढविण्याचे काम रखडले आहे. तलावाची उंची वाढवून सांडवा व वितरिकेचे अपूर्ण कामे पूर्ण झाल्यास सिंचन क्षेत्रामध्ये वाढ होणार असून, उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही मार्गी लागणार असल्याने ही योजना पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.

खोरोचीमध्ये नव्याने बॅरेजेस बांधणे 
दरवर्षी पावसाळ्यामध्ये नीरा नदीमधून ३० टीएमसीपेक्षा जास्त पाणी नीरा नदीमधून वाहून वाया जाते. नीरा नदीवरती उद्धट व सोमथळीच्या धर्तीवर खोरोचीमध्ये नव्याने बॅरेजेस बांधल्यास नीरा नदीतील बंधाऱ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये कायमस्वरुपी पाणी साठा राहणार आहे. त्यामुळे नदीच्या काठच्या व २२ गावातील शेतकऱ्यांना नदीचे पाणी उपलब्ध होणार आहे. या कामाचा तत्काळ सर्वेक्षण करून अहवाल महामंडळाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

नीरा व भीमा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती 
नीरा नदीवरती जांब, खोरोची, चिखली, वालचंदनगर, कुरवली, नीरनिमगाव, पिठेवाडी व बोराटवाडीमध्ये आणि भीमा नदीवरती भाटनिमगाव, टण्णू, नरसिंगपूर येथे कोल्हापूरी पद्धतीचे बंधारे आहेत. या बंधाऱ्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये पाणी गळती होऊन बंधारा कोरडा पडत असतो. या बंधाऱ्यांची दुरुस्तीच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करून तत्काळ कृष्णा खोरे विकास मंडळाकडे सादर करून आवश्यक निधी मंजूर करण्याचे निर्देश देण्यात आले.

लाकडी- निंबोडी उपसा योजना 
लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजना गेल्या ३० वर्षापासून रखडली आहे. या योजनेमुळे तालुक्यातील 5600 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून, याचे तत्काळ सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले. 

नीरा डावा व खडकवासला कालव्याची दुरुस्ती 
नीरा डावा कालवा व खडकवासला कालव्याची दुरावस्था झाली असून, पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात होत आहे. नीरा डाव्या कालव्यामध्ये वीर धरणाणातून ८२५ क्यूसेक वेगाने सोडलेले पाणी गळती व चोरीमुळे इंदापूर तालुक्यातील टेलला सुमारे १०० क्युसेक मिळते. त्यामुळे सिंचन होण्यास वेळ लागतो. त्यामुळे दोन्ही कालव्याची वहन क्षमता वाढविण्यासाठी कालव्याचे सर्वेक्षण करून अस्तरीकरण व काँक्रिटीकरण करण्याचे अंदाजपत्रक तयार करुन तत्काळ शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्याचे आदेश देण्यात आले.

टाटाच्या धरणातील पाण्याचा प्रश्‍न 
टाटा कंपनीच्या ताब्यात असणाऱ्या मुळशी धरणातून 10 टीएमसी पाणी पुणे शहरासाठी उपलब्ध करुन दिल्यास खडकवासला धरणाचे अतिरिक्त पाणी इंदापूर तालुक्याला मिळणार आहे. त्यामुळे टाटाच्या पाण्यासंदर्भात प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com