धर्मनिरपेक्ष देशाला ‘हिंदुराष्ट्र’ बनविण्यासाठी धडपड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

‘हिंदुत्वाला विरोध करणाऱ्यांना देशद्रोही ठरविले जात आहे. हिंदुत्व मानणारे आणि न मानणारे, अशा पद्धतीने विषमता पेरली जात आहे.

धर्मनिरपेक्ष देशाला हिंदुराष्ट्र म्हणून ओळख देण्याची राजकीय धडपड सुरू झाली आहे,’’ असा आरोप ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांनी केला.

पुणे - ‘हिंदुत्वाला विरोध करणाऱ्यांना देशद्रोही ठरविले जात आहे. हिंदुत्व मानणारे आणि न मानणारे, अशा पद्धतीने विषमता पेरली जात आहे.

धर्मनिरपेक्ष देशाला हिंदुराष्ट्र म्हणून ओळख देण्याची राजकीय धडपड सुरू झाली आहे,’’ असा आरोप ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांनी केला.

आरोग्य सेना आणि भाई वैद्य फाउंडेशनतर्फे भाई वैद्य यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या हस्ते ‘लोकनेते भाई वैद्य स्मृती गौरव’ पुरस्काराचे वितरण करण्यात आले. हा पुरस्कार सहगल यांना जाहीर झाला. परंतु, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या वतीने लेखक किरण नगरकर यांनी पुरस्कार स्वीकारला. या वेळी सहगल यांनी व्हिडिओद्वारे संवाद साधला. या वेळी आरोग्य सेना आणि भाई वैद्य फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अभिजित वैद्य, साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, प्रा. विलास वाघ, समाजवादी नेते पन्नालाल सुराणा, डॉ. प्राची रावळ आदी उपस्थित होते.

सहगल म्हणाल्या, ‘‘सर्वसामान्यांचा मत मांडण्याचा अधिकार हिरावून घेण्यात आला आहे. जे सरकारविरोधात लिहितात, त्यांची हत्या करण्यात येत आहे.’’

नगरकर म्हणाले, ‘‘इतिहास स्वतःच्या सोयीप्रमाणे खोडून टाकण्याचे काम सध्या होत आहे. मोठमोठे पुतळे उभारून भारत घडणार नाही, तर प्रत्यक्ष काम करण्याची गरज आहे आणि ज्यांचे पुतळे उभे केले जात आहेत; त्यांच्या विचारांवर चालण्याची गरज आहे.’

अल्पसंख्याक समाज दहशतीखाली 
सध्याच्या सरकारने कायम व्यक्ती स्वातंत्र्याला विरोध केला आहे. प्रतिगामी विचार करणाऱ्या ‘न्यू इंडिया’मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याला जागा उरली नाही. अल्पसंख्याक समाज दहशतीखाली आहे. त्यांना खोट्या आरोपाखाली तुरुंगात डांबले जात आहे. हे कशाचे लक्षण आहे, असा सवालही सहगल यांनी उपस्थित केला.

Web Title: Secular Country Hindu Rashtra Nayantara Sahgal