मुक्ता, हमीद दाभोलकर, मेघा पानसरेंना "एक्‍स' दर्जाची सुरक्षा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

पुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर व मेघा पानसरे यांच्या नावाचा उल्लेख कर्नाटक पोलिसांना आढळला. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांनी या तिघांनाही "एक्‍स' दर्जाची सुरक्षा पुरवली आहे.

पुणे - गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर व मेघा पानसरे यांच्या नावाचा उल्लेख कर्नाटक पोलिसांना आढळला. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांनी या तिघांनाही "एक्‍स' दर्जाची सुरक्षा पुरवली आहे.

गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी पिंपरी-चिंचवड येथून अमोल काळे यास ताब्यात घेतले होते. त्या वेळी त्याच्याकडे आढळलेल्या डायरीमध्ये विचारवंत, अभिनेते, लेखक-कवींच्या नावांचा उल्लेख आढळला होता. ज्येष्ठ रंगकर्मी गिरीश कर्नाड, राजकारणी व लेखक बी. टी. ललिथा नाईक, वीरभद्र चन्नमल्ला स्वामी यांच्या जिवाला धोका असल्याचे निष्पन्न झाले होते. संबंधीत डायरीतील उल्लेखावरून मेघा पानसरे, डॉ. हमीद व मुक्ता दाभोलकर यांच्याही जिवाला धोका असल्याची सूचना राज्य गुप्तवार्ता विभागाने दिली होती.

या पार्श्‍वभूमीवर हमीद व मुक्ता दाभोलकर, मेघा पानसरे या तिघांनाही स्पेशल प्रोटेक्‍शन युनिट (एसयूपी) या विभागाचे विशेष प्रशिक्षित पोलिस सुरक्षेसाठी देण्यात आले आहेत. ही सुरक्षा व्यवस्था राज्याअंतर्गत प्रवासामध्येही 24 तास त्यांच्यासमवेत राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गौरी लंकेश हत्या प्रकरणात कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतलेला श्रीराम सेनेचा कार्यकर्ता परशुराम वाघमारे व अमोल काळे या दोघांचा डॉ. नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे यांच्या हत्येशी संबंध आहे का ? याचा तपास करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचे विशेष तपास पथक (एसआयटी) यापूर्वीच कर्नाटकात जाऊन आले आहे. त्यातून नेमकी काय माहिती मिळाली, हे अद्यापही समोर आलेले नाही.

Web Title: Security for Mukta Hamid Dabholkar and Megha Pansare