‘सीमा’ नसलेले बहुआयामी व्यक्तिमत्त्व

Seema-Taras
Seema-Taras

व्याख्यान, अभिनय, काव्य, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रांत उमटवला ठसा
पिंपरी - अगदी मराठमोळ्या कुटुंबात वाढलेली ती. मुलीचे शिक्षण झाल्यावर तिचे लग्न, मुलेबाळे यातच स्वतःचे विश्‍व मानणाऱ्यांचा परिसर. मात्र, बारावीत असताना आईचे छत्र हरपूनही वडिलांनी दिलेल्या खंबीर पाठिंब्यामुळे तिने चार विविध प्रकारच्या पदव्या मिळविल्या. एवढेच नव्हे तर शिवचरित्रावर व्याख्यान, नाटकांमधून अभिनय, काव्य, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रांत त्यांनी वयाच्या केवळ २९ व्या वर्षापर्यंत आपला ठसा उमटविला आहे. किवळे येथील ॲड. सीमा तरस असे या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे नाव आहे.

सीमा तरस यांचे शिक्षण बी.एस्सी. (ॲग्री) मध्ये झाले आहे. त्यानंतर त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मार्केटिंग (पीजीडीएम), एलएलबी, एम. ए. (मराठी) अशा पदव्या मिळविल्या आहेत. त्यांचे आजोबा सुदाम तरस यांनी ‘झाले छत्रपती शिवराय’ हे नाटक लिहिले होते. या नाटकाचे ते केवळ लेखकच नव्हे तर निर्माते, गीतकारही होते. त्यामुळे लहानपणापासूनच शिवचरित्राबद्दल सीमा यांच्या मनात ओढ होती. ‘झाले छत्रपती शिवराय’ या नाटकात आता त्या स्वतः सोळा वर्षांच्या बालशिवाजीची भूमिका करतात.

या नाटकाचे गेल्या पंधरा वर्षांपासून त्या सहदिग्दर्शनही करतात. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांवरील नाटकात २३ वर्षांच्या शंभूराजांचीही भूमिका करतात. 

नाटकांमध्ये भूमिका करतानाच व्याख्याने का देऊ नयेत, असा एक विचार त्यांच्या मनात आला. त्यानुसार २०१२ पासून त्यांनी शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि जिजाऊ यांच्यावर व्याख्याने देण्यास सुरुवात केली. राज्याच्या कानाकोपऱ्यात त्यांची तीनशेहून अधिक व्याख्याने झाली आहेत. शिक्षणाची प्रेरणा वडिलांकडून तर कलेची आजोबांकडून मिळाल्याचे त्या सांगतात. नाटके आणि व्याख्यानासाठी जेव्हा त्या घराबाहेर असतात, तेव्हा घरची जबाबदारी त्यांची बहीण पूजा सांभाळते. ती घरी असल्यानेच मी हे सर्व करू शकते, असे सीमा आवर्जून सांगतात. मुलीचा विवाह करा, असे वडिलांना सांगणाऱ्यांना आधी तिचे भवितव्य घडवायचे असल्याने त्याला स्पष्ट शब्दांत नकार दिला.

मुलांना करिअरची नेमकी दिशा मिळावी म्हणून २०१६ मध्ये त्यांनी अध्ययन प्रबोधिनी ही संस्थाही सुरू केली. त्याद्वारे ३५०० मुलांसाठी व्यक्तिमत्त्व विकासासाठीचे उपक्रम राबविले. पहिली ते बारावीपर्यंतच्या दहा हजारांहून अधिक मुलांचे समुपदेशन केले. तसेच पंधरा हजार पालकांचेही ‘स्मार्ट पेरेंटिंग’बाबत समुपदेशन केले. या संस्थेच्या त्या संस्थापक 
असून, बहीण पूजा व्यवस्थापकीय संचालक आहे.

साहित्य क्षेत्रातही योगदान
एवढे सर्व करीत असतानाच त्या कविताही करतात. २००९ मध्ये साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखा पावसाळी बाल साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षाही होत्या. वाचन, लेखन, कला या सर्वांचीच त्यांना आवड आहे. सध्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर त्या कादंबरी लिहीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com