
पुणे : आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या चित्रपटांना नावलौकिक मिळविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नवोदित फिल्म मेकर सोहिल वैद्य यांची ‘ब्रिटिश फिल्म ॲकॅडमी फॉर प्रेस्टिजियस’च्या ‘न्यूकमर्स प्रोग्रॅम’ आणि हॉलिवुडमध्ये नामांकित चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या स्टारलाइट मिडियाच्या ‘स्टार कलेक्टिव प्रोग्रॅम’साठी निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नवोदित फिल्म मेकर्सला प्रोत्साहन देण्यासाठी ब्रिटिश फिल्म ॲकॅडमीच्या वतीने चार वर्षांचा प्रोग्रॅम आयोजित केला आहे. यातून जगभरातून ४० नवोदितांना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव गाजविण्याची संधी मिळू शकणार आहे.
यात भारतासह ऑस्ट्रेलिया, चीन, फ्रान्स, इस्त्राईल, इटली, केनिया, न्यूझीलंड, पोलंड, रशिया, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका अशा विविध देशातील तरुणांचा सहभाग आहे. सोहिल यांना अमेरिकेचा प्रतिष्ठित असा ‘गिल्ड ऑफ अमेरिका सर्वोत्कृष्ट फिल्म’ पुरस्कार यापूर्वी मिळाला आहे. जागतिक चित्रपट क्षेत्रात नामांकित असलेल्या या दोन्ही संस्थांच्या नवोदित फिल्म मेकर्सला प्रोत्साहन देणाऱ्या खास प्रोग्रॅमसाठी निवड होणे, हे अभिमानास्पद असल्याचे सोहिल यांचे म्हणणे आहे.
‘‘ब्रिटिश फिल्म ॲकॅडमीच्या चार वर्षाच्या प्रोग्रॅममुळे हॉलिवूडमधील नामांकित दिग्दर्शक, फिल्म मेकर्स यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच त्यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळेल. मी यापूर्वी केलेल्या फिल्म्स जवळपास ८० आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाल्या असून त्याला विविध पुरस्कारही मिळाले आहेत. व्यावसायिकदृष्ट्या विकसित होण्यासाठी हा प्रोग्रॅम खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच अनेक नामांकित हॉलिवुड चित्रपटाची निर्मिती करणारी स्टारलाइट मीडिया ही संस्था आहे. या संस्थेच्या स्टार कलेक्टिव प्रोग्रॅमसाठी निवड होणेही अभिमानास्पद आहे. या निवडीमुळे माझ्या काही फिल्मस्साठी निधी मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. अर्थात, या दोन्ही प्रोग्रॅममध्ये मोठी स्पर्धा असणार आहे.’’
- सोहिल वैद्य, नवोदित फिल्म मेकर