लगेजसाठीही आता ‘सेल्फ चेक इन’

लगेजसाठीही आता ‘सेल्फ चेक इन’

पुणे - विमानतळावर पोचलात.... तुमच्या बॅगा चेक इन करायच्या आहेत तर, त्यासाठी आता काउंटरवर जायची गरज नाही. विमानतळाच्या आवारातील किऑसवरदेखील ही सुविधा उपलब्ध होऊ शकते. ‘मेड इन इंडिया’ अंतर्गत पुण्यातील एका उद्योजकाने तयार केलेल्या या मॉडेलला ‘एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडिया’ने (एएआय) नुकतीच मंजुरी दिली असून येत्या १५ दिवसांत लोहगाव विमानतळावर त्याची अंमलबजावणी होणार आहे. प्रवाशांना बोर्डिंग पास किऑसद्वारे ‘सेल्फ चेक इन’ करून घेता येतो. आता ‘लगेज’ सेल्फ चेक इन होणार आहे. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे. 

लांबच्या प्रवासास निघालेल्या प्रवाशांना बॅगा विमानतळावर ट्रॉलीवर उतरवून घेऊन संबंधित विमान वाहतूक कंपनीच्या काउंटरवर जावे लागते. तेथे वजन झाल्यावर बॅगा चेक इन करता येतात. त्यानंतर त्यांना बोर्डिंग पास मिळतो. या प्रक्रियेत प्रवाशांना भरपूर वेळ लागतो. ही समस्या सोडविण्यासाठी पुण्यातील सिद्धेय इन्स्ट्रूमेंटेशन ओपीसी प्रा. लि. च्या मृदुला पाटील आणि उमेश कुमार यांनी पुढाकार घेतला. त्यांनी एक किऑस तयार केला आहे. त्याला बेल्ट असेल. प्रवाशांनी विमानतळावर पोचल्यावर किऑसजवळ जायचे. त्यावरून बोर्डिंग पास घेतल्यावर त्यातील प्लॅटफॉर्मवर बॅग ठेवायची. तिला स्वयंचलित पद्धतीने टॅगिंग होईल. वजनाच्या मर्यादेत असल्यास ती बॅग प्लॅटफॉर्मवरून बेल्टवर जाईल व तेथून संबंधित विमानाच्या लगेजमध्ये ती पोचेल. संबंधित प्रवाशांच्या बॅगांवर त्या विमानाचा क्रमांक, प्रवासी कोठे जाणार आहे, त्याचा तपशील आदींचे स्टिकर आपोआप लागले जातील. त्यात बारकोड असेल. त्यामुळे ती बॅग चुकून दुसऱ्या विमानात गेल्यास अलार्म वाजणार आहे. या पद्धतीमुळे लगेज मिसप्लेस होणे टळणार आहे. 

या मॉडेलला ‘एएआय’ने नुकतीच मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात प्रयोग म्हणून लोहगाव विमानतळावर पंधरा दिवसांत हे मॉडेल कार्यान्वित होईल. त्यासाठी ‘एअर एशिया’ विमान वाहतूक कंपनीशी करार झाला आहे. एअर एशियाच्या पुण्यातून दररोज बंगळूर, दिल्ली, जयपूर शहरांत सहा फ्लाईट जातात. त्यामध्ये प्रवाशांना ही सुविधा उपलब्ध होईल. दुसऱ्या टप्प्यात अन्य शहरांमध्ये विविध विमान वाहतूक कंपन्यांशी ही सुविधा उपलब्ध होणार आहे. विमानतळ सूत्रांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे. 

लगेज सेल्फ चेक इन मॉडेलमध्ये अचूकता आहे. त्यामुळे प्रवाशांच्या बॅगा इतरत्र जाणार नाही. सुमारे तीन ते पाच मिनिटांत किऑसवर ही प्रक्रिया पूर्ण होईल. यामुळे प्रवाशांचा वेळ व विमान कंपन्यांचे मनुष्यबळ वाचणार आहे.
- मृदुला पाटील, सिद्धेय इन्स्ट्रूमेंटेशन

लगेज सेल्फ चेक इन करण्याचे मॉडेल चांगले वाटते मात्र त्यात अचूकता हवी. किऑसची संख्याही पुरेशी हवी. या नव्या प्रयोगाचे प्रवासी म्हणून मी स्वागत करते. 
- ॲड. गीतांजली कडते, प्रवासी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com