#PuneTraffic स्वयंशिस्त अन्‌ पीएमपीच फोडेल कोंडी ! 

#PuneTraffic स्वयंशिस्त अन्‌ पीएमपीच फोडेल कोंडी ! 

वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य पुणेकर हैराण अन्‌ अस्वस्थ झाले आहेत. त्याचा परिणाम नोकरी-व्यवसायासह वाढत्या प्रदूषणामुळे आरोग्यावरही होत आहे. महापालिका आणि पोलिसांनी त्यांची जबाबदारी पार पाडण्यासाठी वेगाने पावले उचलण्याची गरज ‘सकाळ’कडे शेकडो नागरिकांनी व्यक्त केली. तसेच, सक्षम सार्वजनिक वाहतुकीबरोबरच वाहनचालकांनी नियमांचे पालन करण्याचीही गरज मांडली. 

तज्ज्ञ म्हणतात.... 
प्रतापसिंह भोसले (ट्रॅफिक इंजिनिअर) -
वाहने सामावून घेण्याची शहराची क्षमता आता संपली आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीशिवाय पर्याय नाही. त्यासाठी सध्या तरी पीएमपीला बळ द्यायची गरज आहे. उत्तम सार्वजनिक वाहतूकच पुण्याच्या कोंडीचे उत्तर आहे. त्यासाठी दोन्ही महापालिकांनी निश्‍चित धोरण ठरवून अंमलबजावणी केली पाहिजे. चौकाचौकांतील सिग्नल परस्परांना जोडण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरणे गरजेचे आहे.

अनघा परांजपे पुरोहित (अर्बन प्लॅनर) - खासगी वाहनांची संख्या कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करून सार्वजनिक वाहतूक सक्षम करायला पाहिजे. रस्त्यांच्या लांबी आणि रुंदीमध्ये सुधारणा करायला हव्यात. वाहतुकीचा आराखडा दीर्घकालीन असून त्यानुसार अंमलबजावणी करण्यासाठी उद्दिष्टे निश्‍चित केली पाहिजे. त्याचबरोबर वाहतुकीच्या प्रश्‍नांबाबत नागरिकांमध्येही जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे.  

महापालिकेने काय करावे...
वाहतूक कोंडी होणारे ठराविक चौक निश्‍चित करणे 
प्रमुख चौक अतिक्रमणमुक्त करणे 
खड्डे तातडीने बुजविले पाहिजे 
कामे सुरू असलेल्या ठिकाणी वॉर्डन नियुक्त करणे 
वाहतूक नियंत्रक दिव्यांचे सिक्रोनायझेशन 
वाहतूक नियंत्रक दिव्यांना बॅटरी बॅकअप देणे  

पोलिसांनी काय केले पाहिजे? 
गर्दीच्या वेळेत कारवाईपेक्षा नियमनावर भर हवा
कोंडीच्या ठिकाणी जादा पोलिस कर्मचारी नियुक्त करावे  
वाहतूक पोलिस काही वेळ तरी झेब्रा क्रॉसिंगजवळ हवेत  
नो पार्किंग, नो एंट्रीमधील बेशिस्त चालकांवर कारवाई 
चौकांतील अतिक्रमणांवर कारवाई 
कोंडी सोडविण्यासाठी मार्शल 

नागरिक म्हणतात...
   सोहराब खान - किरकटवाडी ते बावधन, हे सुमारे १२ किलोमीटर अंतर पार करण्यासाठी रोज दीड-दोन तास लागतात. कोंडी दिसली की मी वाहतूक पोलिसांशी ट्विटर, व्हॉटसअप, फेसबुकवरच्या माध्यमातून संवाद साधतो. पण, प्रतिसादच मिळत नाही. मग सांगायचे तरी कोणाला? 

   शांतिकुमार चौगुले - सिंहगड रस्त्यावरून खराडीतील इऑन आयटी पार्कला जाण्यासाठी मला दोन तास लागतात. मुंढव्यातील सिग्नल पार करण्यासाठी एक तास लागतो. मुंढवा बाह्यवळण रस्त्यावरील समस्याही तीव्र झाली आहे. त्याकडे तातडीने लक्ष द्यायला हवे. 

   हर्शल वडके - हिंजवडीच्या फेज ३ ला जाण्यासाठी आता फेज १ आणि २ मार्गे जावे लागते. कारण माण, चांदे, नांदे, सोनगाव येथील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. तीनही फेजची गर्दी एकाच रस्त्यावर येऊन वाहतूक कोंडी होते. तसेच, वारजे ते चांदणी चौकदरम्यानचा रस्ताही खराब झाला आहे. 

   रमेश ओलागिरी - कस्तुरे चौक, घसेटी पुलाजवळील स्वामी समर्थ मंदिराजवळ मोठ्या प्रमाणात बेशिस्तपणे वाहने लावली जातात. त्या ठिकाणी कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांना वारंवार कळविले तरी दुर्लक्ष केले जाते. त्यातूनच परिसरात वाहतुकीची कोंडी होते. 

   सौरभ निकम - जुनी सांगवी ते सेनापती बापट रस्ता हा प्रवास किमान तासाभराचा झाला आहे. पदपथावरून दुचाकी चालवून चालक पुढे जातात आणि कोंडी करतात. या मार्गावरील सिग्नल बंद असतात. तसेच, वाहतूक पोलिसही दिसत नाही.

   मोहन पवार - बिबवेवाडी परिसरातील अरुंद रस्ते व मोठ्या पदपथांमुळे वाहतूक कोंडी होते. पोलिसांनी कारवाईपेक्षा नियमनावर भर द्यायला हवा. ओला-उबरची संख्याही वाढली आहे. त्‍यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com