दूध भेसळ रोखण्यासाठी नागपूर व मुंबईची पथके पाठवा : जानकर

प्रफुल्ल भंडारी
शुक्रवार, 18 मे 2018

दौंड (पुणे): दूध भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाची नागपूर व मुंबई येथील भरारी पथके पाठवून धाडी टाकाव्यात, अशी मागणी राज्याचे दुग्धविकास व पशुसंवर्धन खात्याचे मंत्री महादेव जानकर यांनी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांच्याकडे केली आहे.

दौंड (पुणे): दूध भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाची नागपूर व मुंबई येथील भरारी पथके पाठवून धाडी टाकाव्यात, अशी मागणी राज्याचे दुग्धविकास व पशुसंवर्धन खात्याचे मंत्री महादेव जानकर यांनी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांच्याकडे केली आहे.

दौंड शहरातील राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक पाचच्या मंगलमुर्ती सभागृहात आज (शुक्रवार) कै. सुभाषअण्णा कुल चॅरिटेबल मेमोरियल ट्रस्टच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या महा आरोग्य शिबिराचे उद्घाटन गिरीश बापट यांच्या हस्ते झाले व त्या प्रसंगी बोलताना महादेव जानकर यांनी ही मागणी केली. राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल, मुख्यमंत्री आरोग्य सहायता कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे, नगराध्यक्षा शीतल कटारिया, माजी आमदार श्रीमती रंजना कुल, दौंड मेडीकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॅा. सुनीता कटारिया, समादेशक श्रीकांत पाठक आदी उपस्थित होते.

महादेव जानकर म्हणाले, 'राज्य सरकार दूध उत्पादकांना व ऊस उत्पादकांना चांगला दर देण्यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु दूध उत्पादकांकडून संकलित केलेल्या एका टँकरच्या दुधावर प्रक्रिया करुन त्याचे तीन टँकर दूध कृत्रिमरित्या तयार केले जात आहे. भेसळखोरांवर कारवाईचे अधिकार अन्न व औषध प्रशासनाकडे असल्याने दुधाची ही भेसळ रोखण्यासाठी नागपूर व मुंबई येथील भरारी पथके पाठवून भेसळखोरांवर धाडी टाकाव्यात.'

दुधाच्या भेसळीमुळे अनेकांचे आरोग्य बाधित झालेले असताना राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी या आरोग्य शिबिराच्या व्यासपीठावर गिरीश बापट यांच्याकडे भेसळखोरांवर कारवाई करण्याची मागणी करून नागपूर व मुंबई येथील पथके वगळता अन्य जिल्ह्यातील पथके अपेक्षित कारवाई करीत नसल्याच्या चर्चांना एकाप्रकारे बळ दिले आहे.

Web Title: Send Nagpur and Mumbai Squads to prevent milk adulteration: jankar