लय, ताल, रंजन, नर्तन 'आवर्तन'

 नीला शर्मा 
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

लय, ताल, शब्द, नाद व भावाभिव्यक्तीच्या आवर्तनांमधून पदन्यासाची चमत्कृती पाहायला मिळत होती. कृष्णाच्या जीवनावर आधारित विविध नाट्यपूर्ण प्रसंग नृत्यातून साकारत होते. एकल व सामूहिक नृत्याविष्काराचं रम्य दर्शन घडत होतं. 

लय, ताल, शब्द, नाद व भावाभिव्यक्तीच्या आवर्तनांमधून पदन्यासाची चमत्कृती पाहायला मिळत होती. कृष्णाच्या जीवनावर आधारित विविध नाट्यपूर्ण प्रसंग नृत्यातून साकारत होते. एकल व सामूहिक नृत्याविष्काराचं रम्य दर्शन घडत होतं. 

कथ्थक ही नृत्यशैलीच मुळीची कथनाचं भाषांतर लयबद्ध शरीर हालचालींतून करणारी. ज्येष्ठ कथ्थक नृत्य कलावंत मनीषा साठे यांच्या दीर्घकालीन साधनेची झलक त्यांच्या एकल व शिष्यांनी केलेल्या सामूहिक नृत्यरचनांमधून बघायला मिळाली. "गानवर्धन' व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातर्फे आयोजित कार्यक्रमात रविवारी (ता. 6) सायंकाळी टिळक स्मारक मंदिर रंगमंचावर बहारदार नृत्यरचना सादर झाल्या. 

हिंडोल राग व झप तालात बांधलेल्या अंबिकास्तवनानं मनीषाताईंनी आरंभ केला. पाठोपाठ त्यांनी नऊ मात्रांच्या मत्ततालावर आधारित तिपल्ली व चौपल्लीयुक्त बंदिशी पदन्यासातून दाखवल्या. नंतर पखवाजवादकानं केवळ उजवा हात वापरून पेश केलेली रचना स्वत:ही फक्त उजव्याच हाताच्या संचालनातून मांडली. एक ते नऊपर्यंतच्या अंकांचा उपयोग तऱ्हेतऱ्हेनं करत गिनती सादर केली. मग तिश्र गती व चतश्र जातीतील ताल प्रस्तुतीनं मोहून घेतलं. 

मनीषाताईंच्या शिष्यांनी कृष्णाच्या रासलीलेत तल्लीन झालेल्या गोपी, मराठी नाट्यगीतांवर आधारित मेडली, सतारीच्या सुरावटींवर आधारित नावीन्यपूर्ण प्रयोग व त्याचबरोबर भारतीय तसंच पाश्‍चात्य संगीताच्या मिलाफाला जिवंत करणारी अभिव्यक्ती केली. कार, चक्रीतली विविधता, तांडव व लास्य अंगाची सुखद गुंफण, चपळ व लालित्यपूर्ण हालचाली, भक्तिभावना या सगळ्याला पारंपरिक व आधुनिकतेची जोड लाभलेलं ते रमणीय नर्तन आवर्तन होतं.

Web Title: Senior dance artist Manisha Sathe's info