खड्ड्यांची मालिका  वाघोलीत कायम 

नीलेश कांकरिया 
बुधवार, 14 ऑगस्ट 2019


पुणे  : वाघोलीत काही ठिकाणचे खड्डे वर्षानुवर्षे आहेत. पावसाळा आला की त्या ठिकाणचा परिसर हा खड्ड्यांचे साम्राज्य होतो. तात्पुरती दुरुस्ती अन्‌ पावसानंतर पुन्हा खड्डे, ही मालिका कायम आहे. परिसरात अनेक वर्षांपासून हीच स्थिती आहे. मात्र त्यात प्रशासनाकडून ठोस भूमिका घेतली जात नसल्याने परिस्थितीत बदल होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 

पुणे  : वाघोलीत काही ठिकाणचे खड्डे वर्षानुवर्षे आहेत. पावसाळा आला की त्या ठिकाणचा परिसर हा खड्ड्यांचे साम्राज्य होतो. तात्पुरती दुरुस्ती अन्‌ पावसानंतर पुन्हा खड्डे, ही मालिका कायम आहे. परिसरात अनेक वर्षांपासून हीच स्थिती आहे. मात्र त्यात प्रशासनाकडून ठोस भूमिका घेतली जात नसल्याने परिस्थितीत बदल होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 
पावसाळ्यात रस्त्यांची दुरवस्था होत असल्याने नागरिकांसह वाहनचालकांना कसरत करावी लागते. या खड्ड्यांमुळे छोटे-मोठे अपघात होत असतात, तसेच वाहतूक कोंडीत भर पडत असते. वाघोली परिसरातील विविध भागांतील रस्त्यांच्या सद्यस्थितीचा घेतलेला हा आढावा. 
- जे. जे. नगर परिसर, केसनंद रस्ता : साधारणतः 200 ते 300 मीटरचा परिसर, त्यात किमान 30 ते 40 खड्डे. पुढील रस्ता कॉंक्रिटचा. ज्या ठिकाणी खड्डे आहेत तेथेच मोठी वस्ती. जवळच बीआरटी बसस्थानक. असा हा रहदारीचा रस्ता. मात्र तो आत्तापर्यंत पक्का दुरुस्त झालेला नाही. ग्रामपंचायत सदस्यांनी स्वखर्चातून खड्डे बुजविले. मात्र ते फक्त पाऊस पडेपर्यंत टिकले. जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या या रस्त्यावर पक्‍क्‍या दुरुस्तीची गरज आहे. 

- सिद्धिविनायक पार्क परिसर, आव्हाळवाडी रस्ता : हा रस्ता पुढे मांजरी आणि हडपसरला जोडतो. त्यामुळे जड वाहतुकीचे प्रमाण जास्त आहे. रस्त्यावरून ड्रेनेजचे पाणीही वाहते. त्यामुळे येथे नेहमीच खड्डे असतात. अनेक वर्षे नागरिकांनी हा त्रास सहन केला. आव्हाळवाडी ते वाघोली या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. सध्या या रस्त्याचे काम आव्हाळवाडीच्या बाजूने सुरू आहे. मात्र हे काम वाघोलीत होईपर्यंत हा पावसाळा खड्ड्यातच काढावा लागेल. 

 बकोरी फाटा परिसर : मुख्य पुणे-नगर हायवेपासून बी. जे. एस. कॉलेजपर्यंत खड्ड्यांचा रस्ता. या रस्त्यावर तीन मोठी शैक्षणिक संकुले आहेत. यामुळे हजारो विद्यार्थ्यांची दररोज ये-जा. साधारणतः 100 ते 200 मीटरचा परिसर. शासकीय निधीवर अवलंबून न राहता शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेतला तरी हा रोड कायमस्वरूपी दुरुस्त होईल. 

आव्हाळवाडी फाटा ते लोहगाव रस्ता परिसर : या रस्त्यावरही वेस चौकापर्यंत अनेक खड्डे आहेत. मुख्य गावात जाणारा हा रस्ता. दुरुस्तीची अनेक वर्षांपासूनची नागरिकांची मागणी. मात्र अद्यापपर्यंत दुरुस्ती नाही. वाघोलीतील हे रस्ते विविध खात्यांतर्गत येतात. यामुळे त्याची दर वर्षी किरकोळ डागडुजी होते. मात्र पावसाळा सुरू झाला की त्यांची तीच दुरवस्था होते. 

वाघोली ग्रामपंचायतीने आपल्या हद्दीतील अनेक रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण केले आहे. याशिवाय काही रस्ते खूप रहदारीचे आणि गरजेचे आहेत. त्याची लांबी कमी आहे. मात्र ते ग्रामपंचायतअंतर्गत नाहीत. ते रस्ते त्या विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन ग्रामपंचायतीने पक्के करण्यास हरकत नाही. यामुळे नागरिकांची सोय होईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A series of pits persist in Wogholi