SuperExclusive:पुणे देणार कोरोना प्रतिबंधक लस 

योगीराज प्रभुणे
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

कोरोना प्रतिबंधासाठी प्रभावी लस निर्माण करण्याचे आव्हान वैद्यक क्षेत्रापुढे आहे. ही लस तयार करण्याचे आव्हान स्वीकारण्यासाठी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट पुढे आली आहे.

पुणे Coronavirus : जगभरातील 24 देशांमध्ये थैमान घालत असलेल्या नवीन कोरोना विषाणूंच्या प्रतिबंधासाठी पुण्यातील "सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'ने (एसआयआय) पाऊल उचलले आहे. लसीच्या चाचण्यांसाठी कंपनी सज्ज झाली असून, प्रयोगशाळा आणि प्राण्यांवरील चाचण्यांनंतर लगेच परवानगी देणाऱ्या देशात कोरोना प्रतिबंधक लसीची मानवी चाचणी होईल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना विषाणूंच्या प्रकारातील नवीन कोरोना विषाणूंचा मानवाला संसर्ग झाला आहे. त्याचा सर्वाधिक उद्रेक चीनमध्ये झाला. चीनसह 24 देशांमधील लाखो जणांना नवीन कोरोना विषाणूंचा संसर्ग झाला आहे. रुग्णांची संख्याही वाढतच चालली आहे. सर्दी, ताप, खोकला, अशी आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. या लक्षणांवर आधारित उपचारांसह काही इतर औषधांच्या आधारावर सध्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र, नवीन कोरोना विषाणूंच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी, त्याच्या प्रतिबंधासाठी प्रभावी लस निर्माण करण्याचे आव्हान वैद्यक क्षेत्रापुढे आहे. ही लस तयार करण्याचे आव्हान स्वीकारण्यासाठी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट पुढे आली आहे. अमेरिकेतील "बायोटेक्‍नॉलॉजी फर्म कोडाजेनिक्‍स' या संस्थेच्या सहकार्याने ही लस शोधण्यात येणार आहे.

नवीन कोरोना विषाणूंवर लस शोधण्यासाठी जगभर यापूर्वीच प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी प्रयोगशाळांमधून या प्रकारचा कृत्रिम विषाणूदेखील तयार करण्यात येत आहेत. या बद्दल 'एसआयआय'चे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला 'सकाळ'शी बोलताना म्हणाले, 'अमेरिकेतील कोडाजेनिक्‍स जनुकीय आधारावर कृत्रिम नवीन कोरोना विषाणू विकसित करणार आहेत. विषाणूला प्रतिबंधक लस विकसित करण्यासाठी प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये बरीचशी वर्षे जातात. त्यानंतर त्या लसीच्या प्राण्यांवरील चाचण्या घेतल्या जातात; पण, उद्रेक झालेल्या विषाणूंचे चार वेगवेगळ्या प्रकारचे कृत्रिम विषाणू आधुनिक तंत्रज्ञानाने निर्माण केले आहेत. त्याच्यावर प्रयोगशाळामध्ये चाचण्या करण्यात येतील.' 'मार्च किंवा एप्रिलच्या दरम्यान प्राण्यांवरील चाचण्यांचे निष्कर्ष समोर येण्याची शक्‍यता आहे. त्याला यश मिळाल्यास मानवावरील चाचण्यांसाठी तातडीने प्रस्ताव पाठविला जाईल. तसेच, थेट मानवी चाचण्या घेतल्या जातील, असेही काही पर्याय पुढे आहेत. त्या आधारावर एक वर्षभरात ही नवीन लस विकसित करण्यात येईल. ही लस नवीन कोरोना विषाणूंना प्रतिबंध करण्यात प्रभावी आहे, हे जगासमोर मांडता येईल,' असेही त्यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा - कोरोनाचे पाप चीनचेच, चीनी संशोधकांचा दावा

आणखी वाचा - डायमंड प्रिन्सेस जहाजावर जपान सरकारने वाटले 2 हजार आयफोन

मानवी चाचण्यांसाठी संपर्क 
'प्राण्यांवरील चाचण्यांनंतर कोणता देश मानवी चाचण्यांसाठी लवकर परवानगी देईल, याकडे आमचे लक्ष आहे. यासाठी वेगवेगळ्या देशांशी संपर्क साधण्यात येईल. कोरोना विषाणूंचा सर्वाधिक प्रादुर्भाव चीनमध्येच झाला. त्यामुळे मानवी चाचण्यांना चीनदेखील लवकर परवानगी देऊ शकेल. कारण, तेथे या लसीची सर्वाधिक गरज आहे,' असेही आदर पूनावाला यांनी स्पष्ट केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: serum institute going to invent vaccine for coronavirus

टॅग्स
टॉपिकस