सोमेश्वरनगर : सर्व्हर झाला डाऊन; जातपडताळणी करण्यात अ़डचणी

संतोष शेंडकर
Tuesday, 29 December 2020

निवडणूक आयोगाचा सर्व्हर स्लो असतानाच आता जातपडताळणी कार्यालयाचा सर्व्हरही आचके देत आहे.

सोमेश्वरनगर : निवडणूक आयोगाचा सर्व्हर स्लो असतानाच आता जातपडताळणी कार्यालयाचा सर्व्हरही आचके देत आहे. शासनाच्या बेबसाईटने असा असहकार पुकारल्याने महा ई सेवा केंद्रात रात्रभर बसून उमेदवार अर्ज भरण्यासाठी धडपडत आहेत. जातपडताळणीच्या वेबसाईटवर अर्जही सबमीट होत नाही आणि पैसे भरलेल्या पावतीची प्रिंटही निघत नाही. परीणामी तहसीलला उमेदवारी अर्ज दाखल करणे आणि जातपडताळणीचा शिक्का मिळविणे ही एक सर्कस झाली आहे. आता राखीव जागा अक्षरशः बिनविरोध होण्याची भिती व्यक्त होत आहे.

'बाबुमोशाय, जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिये'; राजेश खन्ना यांच्या...

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी राज्यात एकाच वेळी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अर्ज दाखल करण्याची उद्या (ता. ३०) शेवटची मुदत असून ३१ डिसेंबरला छाननीची मुदत आहे. यामुळे सर्वत्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याची धावपळ उडाली आहे. आधीच निवडणूक आयोगाने यावेळी कागदपत्रांचा जाच वाढविला आहे.

अशात आयोगाचा सर्व्हर कासवगतीपेक्षाही हळू चालत आहे. तीन नोटरी, पाच-सहा प्रतिज्ञापत्र, बँकेचे स्वतंत्र खाते अशा सोळा कागदांचे जंजाळ आहे. अशात खुल्या प्रवर्गातील अर्ज कसेबसे दाखल होत आहेत. आता खरे संकट निर्माण झाले आहे ते राखीव जागांचे अर्ज दाखल कऱण्याचे. जातपडताळणी कार्यालयाचा सर्व्हरही काम करेनासा झाला आहे. काल दिवसभर बंद-चालूचा खेळ सुरू होता तो रात्रभर तसाच राहिला. एकेक अर्ज भरण्याचे अर्ध्या तासाचे काम तब्बल तीन-चार तासांवर जात होते.

फोटो स्कॅन होत नाहीत, कागदपत्रे सबमीट होत नाहीत अशा तक्रारी होत्या. रात्रभर महा ई सेवा केंद्र गर्दीने खचाखच भरली होती. डोळे चोळत अर्ज आता सबमीट होईल मग सबमीट होईल असे ताटकळत रहावे लागत होते. आता सकाळपासून तर पाचशे रूपयाचे चलन भरल्याच्या पावतीची प्रिंटच निघेना. अर्जाच्या प्रिंटसोबत सोळा प्रकारचे कागद जोडायचे. त्याला पैसे भरल्याची पावती जोडायची. मगच अर्ज तहसील कचेरीत दाखल करता येतो. त्यानंतर तहसीलदार जातपडताणीसाठी शिफारस देतात. ती शिफारस घेऊन पुण्याच्या जातपडताळणी कार्यालयात जायचे. तिथे चार-पाच तास रांगा लावून पोचपावती आणायची. ती जोडल्यावर उमेदवारी अर्ज मान्य होतो. हे काम अंतिम टप्प्यात अशक्यप्राय बनत चालले आहे. यामुळे काहींनी वैतागून निवडणूकच नको असे ठरविले तर काही ठिकाणी अर्ज भरला न गेल्याने जागा बिनविरोध होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

पिंपरे खुर्द (ता. पुरंदर) येथील रूपाली डोंबाळे म्हणाल्या, आधीच ढीगभर कागद जुळविले. रात्री काम झाले नाही. सकाळपासून दुपारी अडीच वाजेपर्यंत महा ई सेवा केंद्रात बसून राहिल्यानंतरही अजून अर्ज सबमीट झाला नाही. आज काम झाले नाही तर उद्या पूर्ण होऊच शकत नाही. अर्ज भरल्यावर प्रिंट काढून तालुक्याला जायचे. तिथे शिक्का घेऊन पुण्याला जाऊन पोचपावती आणायची हे दिव्य आहे. पुण्यातही तीन तालुक्याला एक खिडकी दिलीय त्यामुळे पाच तास लागतात. एका तालुक्याला एक खिडकी करावी.

हे वाचा - 2021ला पृथ्वी होणार नष्ट; नॉस्ट्रेडॅमसची भविष्यवाणी ठरणार खरी?

तसेच आयोगाने ऑफलाईन अर्ज स्वीकारावेत किंवा मुदत वाढवावी. तर पिसुर्टी (ता. पुरंदर) येथील भाऊसाहेब चोरमले म्हणाले, कागदपत्रांना कंटाळून अर्जच दाखल केला नाही. थोपटेवाडी (ता. बारामती) येथील राखीव महिला उमेदवार म्हणाल्या, ऑनलाईन पावती निघेना म्हणून अर्ज सादर करता येईना. अर्ज भरणार केव्हा आणि जातपडताळणीची पोच मिळणार केव्हा? सरकारने लक्ष घालावे. महा ई सेवा केंद्रचालक प्रमोद पानसरे व नितीन भोसले म्हणाले, रात्रभर आमचे केंद्र सुरू होते. कालपासून सर्व्हर सातत्याने बंद पडतोय. आज पाचशेच्या पावतीची प्रिंटच निघेना. आम्ही प्रयत्न करतोय पण बेवसाईट साथ देत नसल्याने उमेदवार हवालदिल झाले आहेत.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: server down difficulty in caste verification