सेट परीक्षा आता ऑनलाइन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

विद्यापीठ अनुदान आयोगाने नेट ऑनलाइन घेण्यास सुरवात केल्याने त्याच मार्गदर्शक तत्त्वानुसार सेटही ऑनलाइन घेण्याचा विचार आहे. यामुळे परीक्षेसाठी राज्यभरात केंद्र वाढतील. तालुकास्तरापर्यंत केंद्र देता येईल. यामुळे विद्यार्थ्यांना सुलभरीत्या परीक्षा देता येईल. ऑनलाइन प्रक्रियेमुळे निकालाही लवकर जाहीर होतील.
- डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत घेतली जाणारी सेट परीक्षा आता ऑनलाइन घेतली जाणार आहे. पुढील वर्षी मे किंवा जूनमध्ये पहिली ऑनलाइन परीक्षा होणार असून, त्यासाठी विद्यापीठाने तयारी सुरू केली आहे.

महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी ही परीक्षा विद्यापीठामार्फत घेतली जाते. आतापर्यंत ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतली जात होती. प्रश्‍नपत्रिका आणि त्याबरोबर उत्तरपत्रिका म्हणून ओएमआर शीट दिली जात होती. मात्र, आता केंद्रीय स्तरावर होणारी ‘नेट’ ऑनलाइन घेतली जाते. त्या पद्धतीने राज्यात होणारी सेटही ऑनलाइन घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. त्यामुळे ही परीक्षा पेपरलेस होणार आहे. यातून परीक्षेसाठी राज्यभरात प्रश्‍नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांच्या वितरणासाठी लागणारा वेळही वाचणार आहे.

ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या परीक्षेसाठी प्रश्‍नांची बॅंक तयार केली जाणार आहे. परीक्षेवेळी त्यातूनच विद्यार्थ्यांना प्रश्‍न येतील. प्रश्‍न कोणते द्यावयाचे, या प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप राहणार नाही. संगणक प्रणालीद्वारेच हे प्रश्‍न विद्यार्थ्यांना दिले जातील. यापूर्वी प्रश्‍नपत्रिकांची छपाई ए, बी, सी, डी अशा संचांमध्ये केली जात होती. आता संच पद्धत नसेल. ऑनलाइन पद्धतीतही पूर्वीप्रमाणेच पहिला पेपर हा ५० प्रश्‍न आणि शंभर गुणांचा असेल, तर दुसरा पेपर दोनशे गुण आणि शंभर प्रश्‍नांचा असेल.

परीक्षेच्या निकालाची पद्धत तीच असेल. परीक्षेनंतर सुरवातीला पहिली उत्तरसूची जाहीर केली जाईल. त्यावर विद्यार्थ्यांना पुराव्यांसह आक्षेप नोंदविता येतील. तज्ज्ञांच्या समितीकडून या आक्षेपांची शहानिशा करून घेतली जाईल. योग्य बदलांसह अंतिम सूची जाहीर करण्यात येईल. या सूचीला विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यता दिल्यानंतर विद्यापीठाकडून परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येईल. केंद्रीय स्तरावर नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत ‘नेट’ घेतली जाते. याच एजन्सीला राज्य स्तरावरील परीक्षा (सेट) घेण्याचे काम देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: set exam online education