पुण्याने दिले सात रुग्णांना जीवदान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 डिसेंबर 2016

पुणे - एकाच दिवशी दोन ‘ब्रेन डेड’ व्यक्‍तींनी अवयवदान केल्याची घटना शुक्रवारी पुण्यात घडली. त्यामुळे हृदय, दोन यकृत, चार मूत्रपिंड दान करून सात रुग्णांना नवे जीवन पुण्याने दिले, अशी भावना वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली.

पुणे - एकाच दिवशी दोन ‘ब्रेन डेड’ व्यक्‍तींनी अवयवदान केल्याची घटना शुक्रवारी पुण्यात घडली. त्यामुळे हृदय, दोन यकृत, चार मूत्रपिंड दान करून सात रुग्णांना नवे जीवन पुण्याने दिले, अशी भावना वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली.

शहराने दोन दिवसांपूर्वी मुंबईतील पंधरा वर्षांच्या मुलाला हृदय दान केले होते. त्यानंतर लगेचच दुसरे हृदयदान केले आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील ‘ब्रेन डेड’ व्यक्‍तीचे हृदय ग्रीन कोरिडोर करून लोहगाव विमानतळावर अवघ्या १९ मिनिटांमध्ये पोचले. तेथून ते हृदय विमानाने चेन्नई येथील रुग्णावर प्रत्यारोपणासाठी घेऊन गेले. दीनानाथ रुग्णालयातील वैद्यकीय समाजसेविका शिल्पा भावे म्हणाल्या, ‘‘सिंहगड रस्त्यावर २८ डिसेंबरला अज्ञान वाहनाने दिलेल्या धडकेने २२ वर्षांचा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याला पोलिसांनी उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर पुढील उपचारांसाठी रुग्णाच्या नातेवाइकांनी दीनानाथ रुग्णालयात आणले होते. अपघातात गंभीर मार लागल्याने त्याचे शरीर उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. रुग्णाच्या मेंदूचे कार्य थांबल्याने तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या समितीने ‘ब्रेन डेड’ असल्याचे त्याच्या नातेवाइकांना सांगितले. तसेच अवयवदान करण्याचे आवाहन केले.’’ 

‘‘रुग्णाचे वडील व भावाने अवयवदानास सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे दान केलेले हृदय प्रत्यारोपणासाठी चेन्नईला घेऊन गेले, तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल रुग्णाला एक मूत्रपिंड आणि दुसरे नाशिक येथील रुग्णाला दान केले. तसेच याच रुग्णालयातील रुग्णावर यकृत प्रत्यारोपण केले,’’ असेही त्यांनी सांगितले.

शहरातून एकाच दिवशी दोन रुग्णांनी अवयवदान केले आहे. ही अत्यंत दुर्मिळ घटना आहे. या वर्षभरात आत्तापर्यंत ५३ रुग्णांच्या नातेवाइकांनी मरणोत्तर अवयवदानाचा निर्णय घेतला आहे. ‘नॅशनल ऑर्गन ॲण्ड टिश्‍यू ट्रान्सप्लॅंट ऑर्गनायझेशन’च्या (नोटो) नियमानुसार हे हृदय चेन्नई येथील फोर्टिस रुग्णालयात देण्यात आले.

- आरती गोखले, झोनल ट्रान्सप्लॅंट को-ऑर्डिनेशन कमिटी

Web Title: Seven patients given the gift of life

टॅग्स