पाच एकरांच्या भूमिपुत्राचे कुटुंब रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

प्रशासनावर राजकीय दबाव
एका बड्या नेत्याचा आम्ही सध्या कसत असलेल्या जमिनीवर डोळा होता. त्याच्या सांगण्यावरूनच अधिकारी आम्हाला त्रास देत होते. अधिकाऱ्यांनी काही लोकांकडून पैसे घेतल्याचा संशय आहे. आमच्या वडिलांनी रीतसर परवानगी घेतल्याने आम्ही ही जमीन कसत आहोत. आम्ही येथे कसल्याही प्रकारचे अतिक्रमण केलेले नाही. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी अतिक्रमण झालेले आहे. त्याकडे मात्र पाटबंधारे विभाग दुर्लक्ष करत आहे. आमच्यासारख्या सामान्य भूमिपुत्र शेतकऱ्याला प्रशासनाने जगणे मुश्‍किल केले आहे. आमची ही धडपड केवळ पोट भरण्यासाठी सुरू आहे. आम्हाला या ठिकाणी कुठलीही इमारत अथवा मोठे हॉटेल बांधायचे नाही, अशी उद्विग्न भावना शंकर रायकर यांनी व्यक्त केली.

किरकटवाडी - सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतलेल्या जमिनीचा कोणताही मोबदला किंवा पुनर्वसन झाले नसल्याने खडकवासला येथील भूमिपुत्र रायकर कुटुंबाला रस्त्यावर येऊन कुटुंबाचा गाडा हाकावा लागत आहे. धरणाच्या चौपाटीवर हातगाडीवर भजी, वडापाव, चहा विकून जीवन जगावे लागत आहे. त्यातही त्यांच्या दुसऱ्या एका जागेवर एका ‘बड्या’ राजकीय नेत्यांचा डोळा आहे. त्यालाही हे कुटुंब न जुमानता झटत आहे.

शंकर रायकर यांचे वडील नारायण बारसू रायकर हे पाटबंधारे विभागात नोकरी करत होते. धरणाच्या खालच्या बाजूला शंकर नारायण रायकर यांची सुमारे ५ एकर वडिलोपार्जित जमीन होती. १९७१ मध्ये ती सार्वजनिक बांधकाम विभागाने ताब्यात घेतली आहे. या जमिनीचा रायकर कुटुंबाला आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळालेला नाही आणि इतरत्र कोठेही पुनर्वसन झालेले नाही. सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या परिवाराचे पोट भरायचे कसे? असा प्रश्न नारायण यांना भेडसावू लागला. त्यांनी पाटबंधारे विभागाकडून रीतसर अर्ज करून खडकवासला धरणाच्या पश्‍चिमेकडील केंद्रीय विद्यालयाजवळील गाळपेर जमीन कसण्यासाठी मिळवली. या जमिनीचा खंड व पाणीपट्टी रायकर परिवार नियमितपणे भरत आलेला आहे; परंतु सध्या कसत असलेल्या जमिनीवरूही बळाचा वापर करून प्रशासनाने शंकर रायकर व त्यांच्या परिवाराला कित्येक वेळा हाकलण्याचा प्रयत्न केला.

शंकर रायकर व त्यांची पत्नी पार्वती रायकर व मुले नवनाथ व मच्छिंद्रनाथ धरणाच्या चौपाटीवर चहा, वडापाव, भजी, भाजलेले मक्‍याचे कणीस आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उसाचा रस विकून आपले पोट भरत आहे.

घरातील मुला-मुलींचे शिक्षणही याच व्यवसायातून मिळालेल्या पैशांवर केले जात असल्याची माहिती पार्वती रायकर यांनी दिली. खडकवासला धरणाचे शाखा अभियंता राजकुमार क्षीरसागर यांच्याशी याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांचा दूरध्वनी बंद असल्याने तो होऊ शकला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shankar Raikar Family Issue