चला वारीला : ना धावला अश्व उभा, रुसला लिंबाचा चांदोबा

chandobacha-limb.jpg
chandobacha-limb.jpg

Wari 2020 : लोणंदनगरीचा दीड दिवसाचा मुक्काम उरकून माऊलींचा पालखी सोहळा निरोप घेतो. सोहळ्यातील पहिले रिंगण चांदोबाच्या लिंबाजवळ असल्याने वारकऱ्यांमध्ये सकाळपासूनच चैतन्य असते. त्याच चैतन्यात पावले झपझप रिंगणाच्या दिशेने चालू लागतात. चालताना लक्षात येते, सकाळपासूनच पुढे लोक चालत आलेले असतात. काही झाडाझुडपांच्या सावलीला विश्रांती घेत असतात. तर काही मोठ्या झाडाखाली रंगलेल्या भारूडात तल्लीन झाले आहेत. दिंडीतील वारकरी सोडले तर अन्य लोक रिंगण पाहण्यासाठी पुढे येऊन थांबतात. तसेच येथील पंचक्रोशीतील भाविक रिंगणाचा सोहळा पाहण्यासाठी पोराबाळांना घेऊन येथे येतात.

भक्तीयात्रेत रमून जातात. परिसरासाठी ती यात्राच असते... माऊलीची! कपाळाला गंध लावून, पोराबाळांना घेऊन बैलगाड्यातून आलेले अनेक शेतकरी चांदोबाच्या लिंबजवळ दुपारी बारापासूनच थांबलेले असतात. काही जण येताना जेवण घेऊन येतात. या भक्तिमय वातावरणात जेवायचे. दुपारनंतर रिंगण पाहायचे आणि दिवस मावळतीला आला की, घरी निघून जायचे. हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा अनेकांचा नित्यनियमच होऊन गेलाय. हरिनामाचा गजर करीत दिड्या चांदोबाच्या लिंबजवळ येऊ लागतात. मानकऱ्यांची लगबग सुरू होते. दोन्ही बाजूने भाविकांची तुडूंब गर्दी झालेली असते. तासन् ‍‍तास भाविक जागा धरून बसलेले असतात. मीडियावाल्यांनी परिसरात ओबीव्हॅन, टॅंकरवरच्या जागा धरलेल्या असतात.

सर्वांना आस असते ती माऊलींची. पोलिसांच्या ताफ्याचा परिसराला गराडा पडलेला असतो. काही अनुचित घडू नये, यासाठी ते काळजी घेत असतात. पण गर्दीतील प्रत्येकाला माहित असते, माऊली समर्थ आहे. मजल दरमजल करीत माऊलींचा रथ चांदोबाच्या लिंबजवळ येतो. त्यावेळी अंदाज घेऊन चोपदार बंधू रिंगण लावायला सुरवात करतात. रिंगण लावण्याचे चोपदार बंधूंचे नियोजन हा एक अभ्यासाचा विषय आहे. अश्‍व कुठे थांबवायचे, रथ कुठे येईल, हे सारे नियोजन अत्यंत महत्त्वाचे असते. ते सर्व ते लिलया पार पाडतात. चांदोबाच्या लिंबाच्या जवळपास रथ आला की, चोपदार अश्‍वांच्या मागे दिंड्याचे दोन भाग करतात. मध्यभागी अश्‍वांना धावण्यासाठी केलेली जागा म्हणजे उभे रिंगण लावणे होय.

रथाच्या पुढे 27 दिंड्या आणि रथामागे वीस दिड्यांपर्यंत रिंगण लावले जाते. त्यानंतर प्रथम स्वाराचा अश्‍व मधून धावत रथाच्या दिशेने येतो. त्यामागे माऊलींचा अश्‍व धावत असतो. मात्र, धावताना त्यांच्यात जणू स्पर्धा लागलेली असते. रथाच्या उजव्या बाजूने अश्‍व रथाच्या मागे वीस दिंड्यापर्यंत जातात. तेथून पुन्हा रथाजवळ येतात. तेथे माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतात. त्यावेळी देवस्थानचे विश्‍वस्त त्यांना हार आणि प्रसाद देतात. त्यानंतर रथाच्या पुढील 27 दिंड्यांमध्ये दोन्ही अश्‍व दौडत पुढे जातात. त्यावेळी अश्‍वांच्या टापाखालील माती कपाळी लावण्यासाठी एकच झुंबड उडते. दिंड्यामध्ये ‘ज्ञानोबा-तुकाराम’ असा अखंड घोष सुरू असतो. त्यानंतर चोपदार रथावर चढून आरती करतात आणि रिंगणाचा सोहळा संपतो. सोहळा पुढे तरडगावचा रस्ता चालू लागतो. माऊली आपल्यात खेळली, या भावनेने वारकऱ्यांच्या चैतन्याला उधाण आलेले असते.

आज प्रत्येक वारकऱ्याच्या मनात हूरहूर असणार. कारण आज वारी नसल्याने रिंगणही नाही. आज चांदोबाच्या लिंबच्या परिसरात शुकशुकाट होता. तेथे दरवर्षीचे चैतन्य नव्हते. भक्तीचा जागर नव्हता. झाडाखाली भारुडाचा आवाज नव्हता... नव्हती गावातील लोकांसाठी माऊलींच्या पालखीची जत्रा... दर्शनासाठीची झुंबड नव्हती. होता तो रिकामा काळा रस्ता आणि उजाड माळरान... या परिसराला या दिवशी असलेले दरवर्षीचे ऐश्‍वर्य लोपले होते. यंदा कोरोना विषाणू जिंकला होता, असे उद्विग्न भावना व्यक्त करण्याव्यतिरिक्त वारकऱ्यांच्या हातात काहीच नव्हते. सुन्न वातावरण लोणंदकरांनी आणि परिसरातील पालखी मार्गावरील गावकऱ्यांनी अनुभवले. वारकरी आपापल्या घरी असले तरी ते आज मनाने चांदोबाच्या लिंबजवळ आले होते. पण त्यांना ती चैतन्यदायी आनंदाची अनुभूती येत नव्हती. आठवणी आणि प्रत्यक्ष अनुभूती यांच्यात अंतर किती असते, हे आज घरात बसलेल्या वारकऱ्यांना निश्‍चित जाणवले असेल. पण त्याहीपेक्षा चांदोबाच्या लिंबाचा परिसर आजचा कधीच दिवस विसरणार नाही. कारण याच एका दिवशी या ठिकाणाला महत्त्व येते. अन्य दिवशी एक छोटेखानी मंदिर सोडले तर येथे काही नाही. माऊलींच्या रिंगण सोहळ्याने त्या दिवशी परिसराचा चेहरामोहराच पूर्णपणे बदलून जातो. भक्तीच्या सागरात हा परिसर विहार करीत असतो. उजाड माळरान आणि डांबरी रस्ता अश्‍वांच्या टापांनी पवित्र होऊन जातो. इतका की प्रत्येक वारकरी त्या रस्त्याची माती कपाळी लावतो. त्याचे कारण, माऊलींच्या चरणाचा स्पर्श तेथे झालेला असतो. आज सारे काही चुकल्यासारखेच... माऊली येणार नसल्याने आज तो लिंबावरचा चांदोबाही नव्हता आणि ग्रहणामुळे सूर्याचे तेजही झाकोळले होते...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com