चला वारीला : पुलावरून वाहे भक्तीचा झरा, माऊलींसाठी आतुरली नीरा

Nira snan.jpg
Nira snan.jpg

Wari 2020 : आळंदीतून निघाल्यानंतर पालखीचा पुणे जिल्ह्याचा प्रवास जेथे संपतो ते गाव नीरा. नीरा नदी ओलांडली की पाडेगावपासून सुरू होतो सातारा जिल्हा. येथे सरकारी आणि पोलिस यंत्रणेचा पालखी सोहळा आदानप्रदान कार्यक्रम होतो. पुणेकर माऊलींच्या सोहळ्याला निरोप देण्यासाठी तर सातारा जिल्ह्याचे अधिकारी माऊलींच्या स्वागतासाठी येतात.

नीरा येथे नदीकाठावर माऊलींच्या कार्यालयात दोन्ही जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांची भेट होते. देवस्थानचे विश्वस्त मंडळ, मानकरी, चोपदार यांच्याशी चर्चा करून पुण्याच्या हद्दीत आलेल्या अडचणी अथवा चुकलल्या व्यवस्थेचे काही निर्णय एकमेकांना सांगितले जातात. काही सुधारणा ही मंडळी पुढील यंत्रणेला सुचवितात. त्यानुसार पुढील वाटचाल सुरू होते. वाल्ह्याहून मुक्काम उरकून सकाळी अकराच्या सुमारास पालखी सोहळा नीरेत दुपारच्या जेवणाच्या विसाव्यासाठी थांबतो. वारकरी नीरा नदीत मनसोक्त अंघोळीचा आनंद घेतात. कपडे धुतात. अंघोळीवरून आठवले. पहाटे तीन- साडेतीनच्या सुमारास ‘तंबू पाडा रे’ अशी आवई येते आणि तंबूतील वारकरी आपली वळकुटी बांधून ट्रकमध्ये टाकतात. मग सुरू होते अंघोळीची गडबड. दिंडीला एकच टॅंकर असतो. सकाळच्या अंधारात टॅंकरमधून पाणी सोडले जाते. त्याखाली एका वेळी अंदाजे दहा ते बारा स्त्री- पुरुष माऊलींची अंघोळ काही सेकंदात होते. संपूर्ण अंगावर पाणी पडले का, या इतकेच काय ते पाहायला लागते. अंगाच्या सर्व भागांवर पाणी आले असे वाटले, की अंघोळ झाली, असे म्हणायचे. मी सासवडच्या तळावर पहिल्या वर्षी ही अंघोळ अनुभवली. तेव्हा कळाले, हे वारकरी किती गोष्टी अॅडजेस्ट करतात. पाचशे- सहाशे दिंड्यांतील वारकऱ्यांनी घरातल्या सारखी अंघोळ केली, तर दुपार जागेवरच होईल. पण हे सारे तत्व वारीत शिकवायला लागत नाही. ते आपोआप शिकले जाते.

डोक्यावरून पायांपर्यंत पाणी पोचले की अंघोळ उरकलीच समजा. वारीत स्त्री- पुरुष भेद राहत नाही, याची अनुभूती या वेळी येते. प्रत्येक जण इथे माऊली असतो. त्यामुळे एका पाण्याच्या धोधाण्याखाली दहा- बारा स्त्री- पुरुषांची डोकी अंघोळीसाठी असतात. ही सारी मंडळी ‘माऊली’ या नामाच्या जगात जगत असतात. म्हणून अनेक जण मला विचारतात, वारी काय शिकवते? तेव्हा मला तरी असे वाटते जीवनात सहज तडजोड करायला वारी शिकवते. सर्व गोष्टीत अॅडजेस्टमेंट... यातील बहुतांश वारकरी घरी शॅावरखाली अभ्यंगस्नान करणारे असतात. पण वारीच्या वाटेने जाताना त्या पाण्याच्या धोधाण्याखाली काही सेकंदात होते तेच अभ्यंगस्नान मानून वीस- बावीस दिवसांची वाटचाल करतात. मग या दरम्यान नीरेसारख्या नदीत डुंबायला मिळाले तर कोण संधी सोडेल? पण दररोज अशीच आंघोळ हवी, मी भिशी भरली मला सोय हवी, असा अट्टहास कोणीच करीत नाही. वारीची ती परिस्थिती, ते माऊलीमय वातावरण, हेच वाटेने वारकऱ्यांचे जग बनते. तिथे कोण घरी किती श्रीमंत आणि कोण गरीब, हे पाहात नाही. समानता हाच काय तो वारीच्या वाटेने जगणारा मंत्र होऊन जातो. नीरा नदीच्या पात्रात माऊलींच्या पादुकांना स्नान घालून सोहळा लोणंद नगरीकडे मार्गस्थ होतो. पाडेगाव हद्दीत ढोल ताशांच्या गजरात या वाटसरूंचे स्वागत होत असते. पण....

यंदा काहीच नाही. मला एक कळत नाही. इतकी असुविधा असूनही वारकऱ्यांना कशी काय वारीची ओढ लागते. इतके कष्ट करून ही माणसे पंढरीत जाऊन विठ्ठलाचे दर्शन कळसावरच घेऊन माघारी फिरतात. कळसाचे दर्शनच घ्यायचे तर मग इतके पहाटे तीन वाजता उठून, अशी आंघोळ करून, पाण्यापावसाची वाटचाल करीत पंढरीत का जातात? काय मिळते त्यांना वारीतून? मलाही हा प्रश्न पहिल्याच वर्षी पडला फक्त. त्याच कारण वारीबाबत शंका, कुशंका न गेलेले आणि पहिल्या वर्षी आलेलेच काढतात. कारण एकदा का तुम्ही वारीत आलात, की तुम्हीच माऊलीमय होऊन जाता. तुमच्यातील शंकासूर त्या वातावरणात कधीच लोप पावतो. हे कशामुळे होते, त्याचे मला कळलेले कारण म्हणाल, तर माऊलीनामक सकारात्मक प्रवाहाचा प्रभाव, असे त्याचे उत्तर मलातरी सुचते. ते पूर्ण बरोबर असेल, असे मला म्हणायचे नाही. पण मला वीस वर्षांच्या काळात आलेल्या अनुभवावरून हे जाणवते. वारीमध्ये मनोभावे सहभागी झालेला प्रत्येक जण माऊलीमय होऊन जातो. एकदा का तो माऊलीमय झाला, की त्यांच्या मनात कसलेही नकारात्मक भाव राहत नाही. म्हणून वारकऱ्यांमध्ये त्रास सहन करण्याची कमालीची ताकद असते. पण वारी पूर्ण करण्याची उमेद त्यांना ती ताकद देत असते. म्हणूनच एकदा वारी केली, तुमचे वेगळे अस्तित्व राहत नाही. तुम्ही वारीमय होऊन जाता. असो.

यंदा कोरोनामुळे या सर्व गोष्टी नाहीत. आज निरेच्या काठावर ना झाल्या प्रशासकीय चर्चा आणि ना दत्त घाटावर माऊलींच्या पादुकांना स्नान. ना दिला पुणेकरांनी निरोप, ना केले सातारकरांनी ढोलताशांच्या गजरात स्वागत. तेथे होती भयाण शांतता. मला जाणीव आहे, वारीचे हे सारे वातावरण वारकऱ्यांना आठवत असणार. तो दिवे घाट, ते नीरा स्नान... वारीतली ती पहाटेची लगबग... भजनाचा आनंद... शेतात बसून दुपारच्या जेवणाचा आस्वाद. दमून भागून गेल्यानंतर रात्री काही सेकंदांत लागणारी झोप... हे सारे यंदा चुकले म्हणून वारकरी नक्की हळहळत असणार. कारण कष्टमय असले तरी वारीत प्रत्येक गोष्ट आनंददायी असते. त्यालाच तर म्हणतात, वारीचं गारूड... जे लाखो भाविकांच्या मनावर आजही आहे... असेल... आणि अखंड पुढेही राहील...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com