वाट हरीची पाहे हर, कसा उधळू भंडार

jejuri.jpg
jejuri.jpg

वारी २०२० : माऊलींचा पालखी सोहळा एकादशीला सासवडला येतो. एकादशी, द्वादशीला सोहळा सासवडमध्येच असतो. दरम्यान, द्वादशीला माऊलींचे धाकटे बंधू सोपानदेवांची पालखी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवते. म्हणजे माऊलींच्या उपस्थितीत सोपानदेव सासवडनगरी सोडतात. दोन दिवस सासवडमध्ये रमलेले वारकरी उजाडताच जेजुरीचा रस्ता धरतात. मला आठवते पाच- सहा वर्षे झाली असतील. पहिल्यांदा पालखी येथून सकाळी सहा वाजता निघायची.

सोहळ्याची सकाळची न्याहरी बोरावके मळा येथे तर दुपारचे जेवण यमाई शिवरी येथे असते. माऊलींच्या सोहळ्याच्या दोन दिवस आधी धो धो पाऊस पडत होता. पालखी सोहळा सकाळी सहाला निघाला. कऱ्हा नदीचा पूल अरुंद असल्याने सोहळा पुढे गेला आणि वाहने मागे राहिली. त्यामुळे यमाई शिवरी येथे सोहळा पोचला, पण अनेक दिंड्यांची वाहने मागे राहिली. पालखीच्या विसाव्याच्या वेळेत वाहने पोचू शकली नाहीत. त्यामुळे अनेक वारकऱ्यांना उपाशी राहावे लागले. त्याबाबत जेजुरीच्या तळावर शासकीय यंत्रणेचा निषेध करण्यात आला. त्यावेळी मला जाणवलेली एक गोष्ट सांगावीशी वाटते. ज्या दिंड्याचे ट्रक पुढे निघून आले होते. त्यांनी स्वयंपाक करून आपल्या दिंडीतील वारकऱ्यांसमवेत अन्य दिंड्यांतील वारकऱ्यांनाही जेवू घातले.

यावेळी वारकऱ्यांनी बुफे पद्धतीने जेवणाचा आस्वाद घेतला. त्याच्या पुढच्या वर्षी सोहळ्याचे मानकरी राजाभाऊ चोपदार यांनी संबंधितांशी चर्चा करून पालखी सोहळा सकाळी सहाऐवजी आठ वाजता सासवडमधून मार्गस्थ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वाहने पुढे निघून जातात. वारकर्‍यांना भोजन करता येते. जेजुरी म्हटले, की खंडेरायाचा भंडारा आलाच. पालखीने जेजुरीच्या हद्दीत प्रवेश केला, की पोतभर भंडारा रथावर जेजुरीकर टाकतात. तेव्हा रथ पिवळाधमक होतो. यावेळी वारकरी शंकराचे अभंग म्हणून खंडेरायाला एक प्रकारे नमनच करतात. पालखी जेजुरीला आली की शैव आणि वैष्णव एकत्र येतात. खंडेराया शंकरांचा अवतार म्हणजे शैवपंथी आहे, तर माऊली हे विष्णूचा अवतार असल्याने ते वैष्णवपंथी. हे दोन्ही पंथीय एकाच गावात मुक्कामी राहतात. त्यामुळे अनेक वारकरी खंडेयारायाच्या दर्शनाला जातात. त्या दिवशी खंडेरायाचे मंदिर रात्रभर सुरू असते.

यंदा हा संगम झालाच नाही. जेजुरी भंडाऱ्याने पिवळी झाली नाही. ना कोणी खंडेरायाला आळविले... ना कोणी त्याच्या दर्शनाला गेले. आज खंडेरायाला भंडाऱ्याबरोबर कपाळी अबीरही हवा असतो. पण कोरोनामुळे त्याला मंदिर बंद करून बसावे लागलेय. साऱ्याच देवांनी आपली कवाडे बंद केली आहेत, आपल्या भाविकांच्या काळजीपोटीच...सध्या कोरोना विषाणू जगापुढे प्रभावी ठरत आहे. सारे जग हबतल झालेय. सारे प्रयत्न तोकडे पडू लागलेत. पंढरीला जाणाऱ्या वाटसरूंची पायी वारी यंदा रद्द करावी लागली आहे. खंडेरायाची सोमवती यात्रा रद्द झाली. पुरंदर तालुकाही संसर्गातून चुकला नाही. कुठे ना कुठे पेशंट सापडत आहेत. दरवर्षी खंडेराया रात्रभर सुरू असलेल्या हरिजागरात तल्लीन होऊन जातो. तोही वारकऱ्यांसमवेत जागर करतो.

आज गडाखाली हरिजागर नाही. पण तरीही तो खंडेराया झोपणार नाही. त्या माऊलीच्या विरहात, त्या हरिगजराच्या आठवणीने... त्याला आज गडावरून ना दिसते वारी, ना माऊलींची पालखी. ना वारकरी ना त्यांचा हरिजागर... त्याला दिसतेय फक्त जगाला आपल्या पाशात घेऊ पाहणाऱ्या कोरोना नामक राक्षसाची दहशत... माऊली आणि त्याच्या सात्विक वृत्तीच्या वैष्णवांची पायी वारी चुकविणाऱ्या कोरोना राक्षसाचा वध करण्यासाठी त्या मार्तंडेयाने आता गड सोडावाच, अगदी अशीच माझ्यासारखी प्रार्थना घरांमध्ये बसलेले लाखो वारकरी आज करीत असतील, याची मला केवळ खात्री नव्हे विश्वास आहे...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com