पवारसाहेबांचा कानमंत्र, उमेदवारी हवी; तर खासगीत सांगायचे 

हरिदास कड
सोमवार, 29 जुलै 2019

उमेदवारी मागायच्या गोष्टी चारचौघांत बोलायच्या नसतात. खासगीत सांगायच्या असतात,  असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्षशरद पवार यांनी दिला. 

चाकण (पुणे) : ""उमेदवारी मागायच्या गोष्टी चारचौघांत बोलायच्या नसतात. खासगीत सांगायच्या असतात,''  असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्षशरद पवार यांनी दिला. 

वडगाव घेनंद (ता. खेड) येथे माजी आमदार (कै.) नारायणराव पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी नारायणराव पवार यांचे नातू ऋषीकेश यांनी, खेड विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीची मागणी प्रास्ताविकात केली. मी माजी आमदार नारायणराव पवारांबरोबर पाच वर्षे फिरलो आहे. मला तालुका पूर्ण माहिती आहे. मतदारसंघात तरुण मतदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे मला पक्षाने संधी द्यावी. रोहित पवार यांना विधानसभेची उमेदवारी देत आहात. मीही तुमचा नातू आहे, मला खेडच्या उमेदवारीची संधी द्यावी, अशी मागणी ऋषीकेश पवार यांनी केली.

या कार्यक्रमात नारायणराव पवार यांचे समर्थक काळूराम कड व इतरांनी भाषणात ऋषीकेश पवार यांना पक्षाने उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे इच्छुक उमेदवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबा राक्षे यांनी सांगितले, की माजी आमदार दिलीप मोहिते यांनी थांबावे व दुसऱ्यांचे नाव सुचवून त्यांना संधी द्यावी. पक्षाने नवा चेहरा द्यावा. 

त्यानंतर शरद पवार म्हणाले, ""ऋषीकेश, इच्छा प्रत्येकाने व्यक्त करायची असते. मला खासगीत सांगायचे.'कार्यक्रमाला खेड तालुक्‍यातील प्रत्येक नेत्याला बोलवायचे. त्यांचा मानसन्मान करायचा. पक्षातील इतर इच्छुक उमेदवारांसमोरच मला उमेदवारी द्या, असे म्हणायचे. बोलताना थोडी काळजी घेतली पाहिजे. मला येथे बाबा राक्षे, दिलीप मोहिते दिसतात, तेही इच्छुक आहेत. या गोष्टी चारचौघांत बोलायच्या नसतात. खासगीत सांगायच्या असतात. मात्र, पक्षाने एखाद्याला उमेदवारी दिली, तर त्याला तुम्ही पाठिंबा दिला पाहिजे.'' 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad pavar say, if u want a candidature, tell us in private