दिल्लीमधील शेतकरी आंदोलनाबाबत शरद पवारांनी केले मोठे भाष्य

कल्याण पाचांगणे
Monday, 18 January 2021

देशातील अनेक संशोधक संस्था मोलाचे काम करत आहेत. मात्र, प्रादेशिक परिस्थिती समोर ठेवायला ते कमी पडतात, असे परखड मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.

माळेगाव ः देशपातळीवर आणि विशेषतः दिल्लीमध्ये आज शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे. गहू आणि तांदळाचे प्रचंड उत्पादन झाल्याने त्याच्या मार्केटींगचे प्रश्न निर्माण झाले आहेत. हा संघर्ष गहू व तांदळाच्या भावाच्या संबंधीचे प्रश्न यामुळेही झालेला आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषीमंत्री ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. तसेच मी कृषीमंत्री असताना पंजाब-हरियाणाच्या शेतकऱ्यांना गहू थोडा कमी करा आणि फळं, अन्नधान्य उत्पादन वाढवा असं सांगितलं होतं. पण त्या लोकांचा प्रतिसाद मिळाला नाही, अशीही खंतही पवार यांनी यावेळी व्यक्त केली. माळेगाव खुर्द (ता. बारामती) येथे राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संशोधन संस्था (नियाम) व अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) तसेच बायर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

आणखी वाचा - इंदापूर तालुक्यात काय घडलं? वाचा सविस्तर बातमी

याप्रसंगी 'सकाळ' उद्योग समूहाचे प्रतापराव पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंधारण मंत्री जयंत पाटील, मंत्री शंकरराव गडाख, राज्यंत्री दत्तात्रेय भरणे, राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार, एकनाथ डवले, संतोष भोसले, पोर्णिमा तावरे आदी उपस्थित होते. तत्पूर्वी केव्हीकेच्या विविध प्रयोगांची व डेअरी फार्मची पाहणी करण्यात आली. 

राज्यात भरड धान्याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. पंजाब, हरियाणासारख्या राज्यात गहू व तांदूळ पिक प्रचंड प्रमाणात घेतल्यामुळे मातीवर परीणाम झाला आहे. तसेच मार्केटींगवरही परीणाम झाला आहे. त्यामुळे दिल्लीत आज संघर्ष सुरू आहे. देशातील अनेक संशोधक संस्था मोलाचे काम करत आहेत. मात्र, प्रादेशिक परिस्थिती समोर ठेवायला ते कमी पडतात, असे परखड मत पवार यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले, ''इथं भातावर संशोधन सुरू आहे, पण इथं भाताचं पिक फारसं घेतलं जात नाही. इथं उसासारखं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. ओरिसा, पश्चिम बंगालसारखी राज्य संपूर्ण भात पिक घेतात. अशा ठिकाणी भातावरच्या संशोधनाची मांडणी करावी. तसेच संशोधकांनी त्या त्या जिल्ह्याच्या पिकपध्दतीचा, मातीचा, मार्केटींगचा विचार करावा आणि जिल्हावार नियोजन करावे.'' 

आणखी वाचा - मुळशी तालुक्यातील निकाल

कृषी विज्ञान केंद्राने तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रीत करून त्याची लोकांमध्ये माहिती करण्यासाठी सप्ताह आयोजित केला आहे. त्यांनी मागील पन्नास वर्षात दूध, फळं, माती व्यवस्थापन, पाणीवापर अशा विविध विषयांवर अभ्यास केला. शेतकऱ्यांना नवे देण्याचा प्रयत्न केला. नियाम, कृषीविद्यापिठांची मदत घेऊन शेतीला आणखी दर्जेदार करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आणखी वाचा - हवेली तालुक्यातील निकाल

राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे, कार्यक्रमात भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महासंचालक त्रिलोचन मोहापात्रा यांनी ऑनलाईन संवाद साधला. याप्रसंगी सुहास जोशी, हिमांशू पाठक, सारंग नेरकर यांनी संशोधन सादर केले. ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.

आणखी वाचा - इंदापूर तालुक्यात काय घडलं? वाचा सविस्तर बातमी

पुणे व सातारा जिल्ह्यातील डेअरी उद्योगाचा शाश्वत विकास करण्यासाठी तसेच ग्राहकाला सुरक्षित व स्वच्छ दूधपुरवठा करण्यासाठी 'ट्रस्ट डेअरी' हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याव्दारे शासन, शेतकरी, दूधसंस्थाचालक, दूधप्रक्रिया संस्था यांना जोडण्याचे काम केले जाणार आहे. यासाठी अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, सोलीडारीडॅड एशिया, न्युट्रीको, गोविंद मिल्क व बारामती अॅग्रो या पाच संस्थांनी सामंजस्य करार केला. शरद पवार यांच्या हस्ते कराराचे प्रकाशन करण्यात आले. 

(संपादन : सागर डी. शेलार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sharad pawar inaugurates agriculture technology week at baramati