मराठा आरक्षणाला पाठिंबाच, पण केंद्राची भूमिकाही महत्त्वाची : शरद पवार

Sharad_Pawar
Sharad_Pawar

पुणे : मराठा आरक्षणाला राज्य सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे; परंतु हा विषय सध्या सर्वोच्च न्यायालयात असल्यामुळे केंद्र सरकारची भूमिका महत्त्वाची आहे. असे असले तरी मराठा आरक्षणावरील स्थगिती उठावी याबाबत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आग्रही भूमिका मांडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीही तीच भूमिका आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारने प्रयत्न करावेत, असे मत पवार यांनी व्यक्त केले होते. त्यावर भाजप नेते आमदार चंद्रकांत पाटील यांनी आरक्षणाबाबत राज्य सरकारने अध्यादेश काढावा असे म्हटले होते. या संदर्भात पवार म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे मंत्री असताना राज्य सरकारने आरक्षण देण्याबाबत एकमताने ठराव पारित केला होता. या ठरावाला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता. याबाबत कदाचित पाटील यांना विस्मरण झाले असावे.

मराठा आरक्षणाचा विषय सध्या सर्वोच्च न्यायालयात गेल्यामुळे महाराष्ट्र सरकारकडून अपेक्षा करणे योग्य नाही. केंद्र सरकारने त्यांच्या विधी तज्ज्ञांची मदत घेण्याची आवश्यकता आहे. मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारने प्रयत्न करावेत हे मी विचारपूर्वकच बोललो आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवावी यासाठी याबाबत महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच याचिका दाखल केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांनी याबाबत चर्चा केली आहे. महाराष्ट्र सरकार आरक्षणाबाबत आग्रही भूमिका घेणार आहे.

पार्थ पवार यांनी ट्विट करून मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. याबाबत पवार म्हणाले, मराठा समाजातील तरुणांमध्ये अस्वस्थता आहे. परंतु आत्महत्या करणे हा मार्ग नाही, ही बाब तरुण पिढीने समजून घ्यावी. राज्य सरकार शंभर टक्के आरक्षणाच्या बाजूने उभे आहे. मी स्वतः निष्णात कायदेतज्ज्ञ कपिल सिब्बल यांच्याशी चर्चा केली आहे. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण योग्य पद्धतीने मांडले जावे. त्यामुळे तरुणांच्या मनातील अस्वस्थता कमी होईल. सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आणखी काहीजणांनी याचिका दाखल केली आणि कोणाच्याही प्रयत्नाने झाले, तर आरक्षण मिळणे हे महत्त्वाचे आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थ पवारांच्या ट्विट बाबत 'पार्थ यांचे ते वैयक्तिक मत आहे' असे सांगितले होते. याबाबत विचारले असता पवार म्हणाले, ते मला माहित नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेत पाठिंबा दिला होता. हीच भूमिका सर्वोच्च न्यायालयातही राहील.

राज्य सरकारबाबत 'वन फाईन मॉर्निंग' कधीही अनपेक्षित घडू शकते, असे विधान आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले होते. याबाबत पवार म्हणाले, "असे काहीतरी घडेल या आशेवर त्यांनी साडेचार वर्षे काढावीत. म्हणजे ते आणखी साडेचार वर्षे घरीच राहतील. ते रात्री झोपताना पहाटे काही झाले तर सकाळी निघावे लागेल, या आशेने कपडे घालून बसले आहेत, अशी मिश्किल टिप्पणी पवार यांनी केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com