आगामी काळातील स्पर्धेत टिकण्यासाठी उत्पादन खर्च कमी करावा : शरद पवार

इथेनाॅल, वीज धंद्याच्या स्पर्धेत टिकण्यासाठी उत्पादन खर्च कमी करण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले.
शरद पवार
शरद पवारSakal

इथेनाॅल, वीज धंद्याच्या स्पर्धेत टिकण्यासाठी उत्पादन खर्च कमी करावा ः शरद पवार यांचे साखर कारखान्यांना आवाहन

कल्याण पाचांगणे, सकाळ वृत्तसेवा

माळेगाव, ता.२१ः देशात वीज आणि इंधनाची पुरेसी गरज विचारात घेता वीज आणि इथेनाॅल निर्मितीचे प्रकल्प सर्वत्र होत आहेत. आगदी जेथे ऊस पिकत नाही अशा ठिकाणीही विशेषतः आंद्रप्रदेश, तेलंगना आदी राज्यात तांदूळ, मक्यापासून इथेनाॅल निर्मिती होत आहे. तशीच विजेची स्थिती आहे. त्यामुळे आगामी काळातील या धंद्यातील स्पर्धा विचारात घेता माळेगावसह सर्वच साखर कारखान्यांनी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे आवाहन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केले. माळेगावने १२ लाख टन ऊस गाळपाचा टप्पा पुर्ण करत १५ लाख टनाचे टार्गेट ठेवल्याबद्दल पवार यांनी यावेळी आर्वजून प्रशासनाचे कौतूक केले.

राज्यात अतिरिक्त ऊस गाळपाचे आवाहन, साखर विक्री, इथेनाॅल व विज निर्मीती, साखर साठ्याचे नियोजन आणि एकरी ऊस उत्पादन घटत चालल्याची कारणे विचारात घेवून शरद पवार यांनी आज माळेगाव कारखान्याला भेट दिली व संचालक मंडळाशी चर्चा केली. राष्ट्रवादीचे संभाजी होळकर त्यांच्या समवेत होते. अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष बन्शीलाल आटोळे, कार्य़कारी संचालक (एमडी) राजेंद्र जगताप यांनी पवारसाहेबांचे स्वागत केले. दरम्यान, आपल्याकडील कारखांदारांना इथेनाॅल स्पलायसाठी जवळचे आॅइल डेपो मिळत नाहीत आणि इतर राज्यात स्पलाय करायचे असल्यास वाहतूक खर्च परवडत नाही. परिणामी केंद्र सरकारच्या अपेक्षेनुसार इथेनाॅल पेट्रोलमध्ये वापरले जात नाही. त्यासाठी देशात ऊस उत्पादन न होणाऱ्या भागामध्ये इथेनाॅल पुरवठा करण्याचे काम कारखान्यांऐवजी आॅइल कंपन्यांनी केल्यास सर्व ठिकाणी इथेनाॅल पुरवठा होऊ शकतो. ही बाब संचालक अनिल तावरे, योगेश जगताप यांनी पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. तोच धागा पकडत पवार म्हणाले, की इथेनाॅल निर्मिती करण्यासाठी सर्वत्र प्रकल्प उभारले जात आहेत. ऊस, तांदूळ, मक्यापासून इथेनाॅल निर्माण होत आहे. त्यामुळे या स्पर्धेत टिकण्यासाठी यापुढे सर्वच कारखान्यांना उत्पादन खर्च कमी करावा लागणार आहे. ११ वर्षांपुर्वी मी या कारखान्यावर कोजनरेशच्या उद्धाटनाला आलो होतो, त्यावेळची आणि अत्ताची स्थिती फाराशी बदललेली नाही. खरेतर माळेगाव, सोमेश्वर आणि छत्रपती कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात प्रशस्त रस्ते, साखरेसाठी वेअर हाऊस आणि एकरी उत्पादन वाढण्यासाठी जमिनी सुपिक सुधारण्यासाठी मोठी गुंतवणूक केल्याशिवाय पर्याय नसल्याचे पवार यांनी सांगितले. माळेगावने ऊस गळीतात १२ लाखाचा टप्पा ओलांडला आणि १५ लाखांपर्य़ंत गळीत करण्याचा मानस ठेवला ही गोष्ट कौतूकास्पद आहे. यावेळी संचालक नितीन सातव, तानाजी देवकाते, मदनराव देवकाते यांनी एकरी उत्पादन वाढविण्यासाठी ड्रिपचे प्रकल्प उभारणी, शेततळी, सबसरफेज ड्रेनेज होण्याकामी शासनस्तराव मदत होण्याची आपेक्षा व्यक्त केली. राजेंद्र ढवाण, सुरेश खलाटे यांनी ऊस हार्वेस्टींगमधील समस्या बोलून दाखविल्या. यावेळी एमडी राजेंद्र जगताप यांनी दोन वर्षातील गळीत हंगामाचा आढावा मांडला. यावेळी संचालक केशवराव जगताप, गुलाबराव देवकाते, तानाजी कोकरे, संगिता कोकरे, स्वप्नील जगताप, सागर जाधव, मंगेश जगताप, प्रताप आटोळे, संजय काटे, प्रमोद खलाटे, तानाजी पोंदकुले उपस्थित होते.

चौकट ः पवारसाहेबांच्या प्रश्नांची उत्तरे...

सोमेश्वरच्या तुलनेत माळेगावची अर्थिक स्थिती कशी आहे, असे विचारले असता अध्यक्ष तावरे यांनी माळेगावचे विस्तारिकरण झाल्याने १९० कोटींचे कर्ज दोन वर्षांपुर्वी कारखान्यावर होते, ते आता ११० कोटींपर्यंत खाली आणले आहे. इथेनाॅल व वीज निर्मितीला चालना देता का असे पवारांनी विचारताच ऊस गळीताबरोबर डिस्टलरी व कोजनरेशन प्रकल्प पुर्ण क्षमतेने चालविण्यात यंदा यश आल्याचे मदनराव देवकाते यांनी सांगितले. साखरेसाठी वेअऱ हाॅऊस बांधलेचे दिसत नसल्याचा प्रश्न येताच प्रशासनाने हे काम प्रस्तावित असल्याचे सांगितले. नीरा नदीकाठच्या क्षारपड जमिनींचा विचार केला की नाही, यावर मात्र साहेब आपणच आम्हाला मदत करावी, अशी विनंती संचालक मंडळाने केली. पवारांनी लागलीच व्हिएसआय संस्थेतील वरिष्ठांशी संपर्क करीत संबंधितांना माळेगावच्या कार्य़क्षेत्रातील माती व पाण्याचा अहवाल देण्याच्या सुचना केल्या. तसेच त्यांनी यंत्रसमामुग्रीतील आधुनिकतेबरोबर अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवासाची व्यवस्था नव्याने करण्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com