लेखणीवर सर्वांचा अधिकार - पवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

पुणे - 'लेखनीच्या संदर्भातील अधिकार ज्यांचा आहे, असे सांगितले जाते, ते वास्तव नसून, अशा चौकटीत न बसणारी उत्तम कादंबरी भारस्कर यांनी लिहिली आहे. या कादंबरीत महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे जीवन एका वेगळ्या पद्धतीने रेखाटले आहे. लेखणी हातात धरण्याचा अधिकार माझाही तितकाच आहे आणि मी दर्जेदार लिखाण करू शकतो, हे या लेखकाने दाखवून दिले,'' असे मत व्यक्त करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त बंधुभाव-भाईचारा फाउंडेशनतर्फे सातारा रस्त्यावरील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित बाळ भारस्कर लिखित "युगार्त' या कादंबरीचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते केले. या वेळी ते बोलत होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, आमदार पंकज भुजबळ, प्रकाशक स्वलिहा हक, इजाज हक, ऍड. अहमद पठाण, बंधुभाव-भाईचारा फाउंडेशनचे अध्यक्ष शब्बीर शेख, सलीम शेख, नूर सय्यद, यासीन शेख, अब्दुल वहाब शेख आदी उपस्थित होते. हक यांनी प्रास्ताविक केले. भारस्कर यांनीही मनोगत व्यक्त केले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन; तर शब्बीर शेख यांनी आभार मानले.

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्याचा समतोल अभ्यास करत इतिहासाला धक्का न लावता चांगल्या साहित्याची रचना
करणे कठीण काम बाळ भारस्कर यांनी केले आहे. संपूर्ण महाराष्ट्र मराठा आणि ओबीसी आरक्षणामुळे विस्कळित झालेला असल्याने यातून महात्मा फुले यांचे विचार मागे पडतो की काय, असे चित्र निर्माण झाले आहे.
- डॉ. श्रीपाल सबनीस, माजी संमेलनाध्यक्ष

Web Title: Sharad Pawar Talking