पुरोगामी विचार पुढे नेण्याची गरज - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

पुणे - देशात प्रतिगामी विचार वाढविण्याचा डाव रचला जात असून, त्यातूनच मनुवाद फोफावत आहे. तो संपविण्यासाठी महात्मा व सावित्रीबाई फुले यांचा पुरोगामी विचार पुढे नेण्याची गरज आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पुण्यात सांगितले. फुले यांच्या नावाच्या पुरस्काराने खरा सन्मान झाला, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. 

महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ पवार यांना बुधवारी प्रदान
करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले. महापौर मुक्ता टिळक, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, देविसिंह शेखावत आदी उपस्थित होते. 

पवार म्हणाले, ‘‘देशात गेल्या काही काळात ठराविक विचारांनी काम सुरू आहे. तसे वातावरण निर्माण केले जात आहे. ते घातक आहे. जातिवाद-धर्मवादाच्या नावाखाली द्वेष पसरविण्याचे काम सुरू असून, मनुवादाचे समर्थन करणारे विचार आज पुन्हा एकदा डोके वर काढत आहेत. मनुवादाचा हा विचार संपविण्यासाठी समतेच्या दिशेने वळायला हवे.’’

‘मला विविध पुरस्कार मिळाले. मात्र, काही पुरस्कारामागे विचार असतो. तसा या पुरस्कारामागे आहे. त्यामुळे फुले यांच्या नावाने मिळालेल्या या पुरस्काराचे समाधान आहे. जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले हे काळाच्या पुढे चालणारे दाम्पत्य होते. फुलेंना शेतकऱ्यांबाबत प्रचंड आस्था होती. त्यांचा समतेचा विचार पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असेही त्यांनी सांगितले.

पवार यांनी सर्वच क्षेत्रात भरीव काम केले आहे. त्यात महिलांचा सन्मान वाढविण्याचे पवारांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे. ही क्षमता पवार यांच्याकडे आहे. देशाच्या इतिहासात त्यांच्या कामाचा आर्वजून उल्लेख करावा लागेल, असे पाटील यांनी सांगितले.

Web Title: Sharad Pawar Talking