जगातील दुधाचे मार्केट काबीज करा : शरद पवार

sharad pavar manchar
sharad pavar manchar

मंचर (पुणे) : ”भारत हा जगात दूध उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे. लवकरच आपण दुप्पट दुध उत्पादन वाढविणार  आहे. जगाचे दुधाचे मार्केट काबीज केले पाहिजे. प्रती संकरीत गाय दूध उत्पादन २० ते २५ लिटर झाले पाहिजे. अल्फा अल्फा हा पौष्टिक हिरवा चार आयात केल्यास येथील शेतकऱ्यांना बाराही महिने चारा उपलब्ध होईल. दररोज पौष्टिक चारा मिळाल्याने गायीचे दूध उत्पादन वाढीचे उदिष्ठ साध्य करता येईल, असा विश्वास जेष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला.

मंचर (ता. आंबेगाव) येथे गोवर्धन दुध प्रकल्प व भाग्यलक्ष्मी डेअरी अंतरराष्ट्रीय प्रकल्पाला पवार यांनी शनिवारी (ता. १) भेट दिली. कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, पुणे जिल्हा सहकार दुध उत्पादन संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, पंचायत समितीचे सभापती संजय गवारी, दत्ता थोरात, नंदकुमार सोनवले आदी या वेळी उपस्थित होते. गोवर्धन दुध प्रकल्पाचे अध्यक्ष देवेंद्र शहा व कार्यकारी संचालक प्रीतम शहा यांनी प्रकल्पातील कामकाजाची माहिती दिली.

तीन हजार २०० संकरीत गायी असलेल्या प्रकल्पातून मानवाचा स्पर्श न होता दूध काढणी ते पॅकिंगपर्यंतच्या व दुग्धजन्य निर्मिती प्रकल्पाची पाहणी पवार यांनी केली. ते म्हणाले की, बारामती येथे संकरीत गायांवर संशोधन करणारे सेन्ट्रल ऑफ एक्सनल केंद्र कार्यान्वित केले आहे. या केंद्रात संकरीत गायी, दूध उत्पादन वाढ, डेअरी उद्योगाबाबत शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन व्हावे, असा उद्देश आहे. शहा यांच्या भाग्यलक्ष्मी प्रकल्पाची ख्याती ऐकून होतो. प्रकल्प पाहून आनंद झाला. कारण, या प्रकल्पाने पश्चिम महाराष्ट्रातील अनेक दूध प्रकल्प व दूध उत्पादक शेतकऱ्यांना संजीवनी देण्याचे काम केले आहे. 

सध्या शेतकऱ्यांकडे असलेल्या संकरीत गायीचे ८ ते १० लिटर दूध निघते. गायीला फक्त ३० टक्केच हिरवा चारा दिला जातो, त्याएवजी ७० टक्के हिरवा व ३० टक्के सुक्का चारा मिळाला पाहिजे. हा चारा आयात करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. वाजवी दारात येथील शेतकऱ्यांना बाराही महिने चारा मिळाल्यास व प्रती गायी दूध उत्पादन वाढल्यास दूध उत्पादक शेतकरी स्पर्धेत टिकून राहतील. भाग्यलक्ष्मी डेअरीत सुरवातीला प्रती गाय १२ लिटर दूध देत होत्या. सध्या दररोज ३६ लिटर दूध निघते. त्यांचे टार्गेट प्रती गाय ४० ते ४५ लिटरचे आहे. या प्रमाणेच शेतकऱ्यांकडे असलेल्या गायींचे दूध उत्पादन वाढीसाठी लक्ष केंद्रित केले जाईल. कारण, शेतीला दुध व्यावसाय पूरक असून वरदान ठरणारा आहे. त्याचबरोबर दुग्धजन्य पदार्थ निर्मितीवर भर दिला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com