दूधप्रश्नी शरद पवार करणार मुख्यमंत्र्यांशी चर्चा

मिलिंद संगई
शुक्रवार, 25 मे 2018

बारामती (पुणे) : राज्यातील दुधाच्या प्रश्नात ज्येष्ठ नेते शरद पवार लक्ष घालणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दुधाच्या प्रश्नावर चर्चा करण्याचे आश्वासन शरद पवार यांनी आज महाराष्ट् राज्य दुध संघ कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले.

बारामती (पुणे) : राज्यातील दुधाच्या प्रश्नात ज्येष्ठ नेते शरद पवार लक्ष घालणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दुधाच्या प्रश्नावर चर्चा करण्याचे आश्वासन शरद पवार यांनी आज महाराष्ट् राज्य दुध संघ कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले.

राज्यातील दुधाच्या संदर्भात हमीभावापासून अनेक समस्या उदभवलेल्या आहेत. या बाबत तोडगा काढण्याच्या दृष्टीने आज कृती समितीचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शरद पवार यांची बारामतीतील गोविंदबाग येथे भेट घेतली. डी.के. पवार, गोपाळराव म्हस्के, प्रकाश कुतवळ, श्रीपाद चितळे, रणजितसिंह देशमुख, घाणेकर, विवेक क्षीरसागर, जगन्नाथ पाटील, संदीप जगताप आदी या प्रसंगी उपस्थित होते.

राज्य शासनाने दुधाचा दर प्रतिलिटरला 27 रुपये दर जाहिर केला आहे, मात्र आजची दुध व्यवसायाची स्थिती पाहता कोणीही हा दर देऊ शकत नाही. दुध पावडर साठी तीन रुपये अनुदान देण्याची शासनाने तयारी दर्शविली असली तरी पावडर परवडत नसल्याने या उपाययोजनेचाही उपयोग दुध उत्पादकांना होणार नाही. त्या मुळे कर्नाटक शासनाने ज्या प्रमाणे प्रतिलिटर पाच रुपये अनुदान दुध उत्पादकांच्या खात्यावर थेट जमा करण्याचा निर्णय घेतला आहे, तोच फॉर्म्युला महाराष्ट्रात राबवावा अशी मागणी कृती समितीच्या वतीने पवार यांच्याकडे करण्यात आली.

या संदर्भात शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना फोनही लावला होती मात्र त्यांच्याशी संपर्क न झाल्याने 28 किंवा 29 मे रोजी मुंबईत या संदर्भात एकत्रित चर्चा करण्याची तयारी शरद पवार यांनी दर्शविली आहे.

तर सरकारनेच दुध खरेदी करावी..
सरकारने 27 रुपयांचा हमीभाव निश्चित केला खरा पण भाव उतरलेले असल्याने हा भाव देणे शक्य नसल्याचे उपस्थितांनी  पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर शासनाने सर्व दूध खरेदी करुन 27 रुपयांप्रमाणे पैसे उत्पादकांना द्यावेत अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करु असे शरद पवार यांनी नमूद केल्याचे कृती समितीचे सदस्य डी.के. पवार यांनी नमूद केले.

मार्ग निघण्याची अपेक्षा
स्वतः पवारांनीच या प्रश्नावर लक्ष घातल्याने आता या प्रश्नावर काहीतरी सन्मान्य तोडगा निघेल अशी क़ती समितीची अपेक्षा आहे. शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांशीच चर्चेचा निर्णय घेतल्याने आता या बाबत काहीतरी पदरात पडेल असे कृती समितीला वाटते.

Web Title: sharad pawar will discus with chief minister about milk issue