शरद सोनवणे आज शिवसेनेत

Sharad-Sonawane
Sharad-Sonawane

नारायणगाव - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम करत मनसेचे राज्यातील एकमेव आमदार शरद सोनवणे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला. सोमवारी (ता. ११) दुपारी दोन वाजता दादर (मुंबई) येथील शिवसेना भवन येथे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत आमदार सोनवणे शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. याबाबतचा निर्णय त्यांनी आज सायंकाळी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केला.

आमदार सोनवणे हे शिवसेना पक्षात प्रवेश करणार, अशी चर्चा मागील पंधरा दिवसांपासून सुुरू होती. ‘मातोश्री’वरून त्यांना पक्ष प्रवेशासाठी हिरवा कंदील मिळाला होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी सोनवणे यांच्या पक्षप्रवेशासाठी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आग्रही होते. मात्र सोनवणे यांना शिवसेनेत प्रवेश दिल्यास पदाचे राजीनामे देण्याचा इशारा जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचके यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी नारायणगाव येथील पत्रकार परिषदेत दिला होता. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनीसुद्धा सोनवणे यांना पक्ष न सोडण्याची सूचना केली होती. मात्र शिवसेना पक्षात सोमवारी प्रवेश करत असल्याचे त्यांनी आज जाहीर केले. 
आमदार सोनवणे म्हणाले, ‘‘खासदार संजय राऊत यांनी जिल्हाप्रमुख राम गावडे यांच्यामार्फत शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचे मला निमंत्रण दिले होते. याबाबतची माहिती मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष ठाकरे यांना दिली होती. मनसे न सोडण्याची सूचना राज ठाकरे यांनी केली होती.

मात्र ग्रामीण भागात मनसेचा प्रभाव नसल्याने जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती व इतर सहकारातील निवडणुकीत मी कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत नव्हतो. हे शल्य माझ्या मनात होते. तालुक्‍यातील शिवसेनेच्या ज्येष्ठांनी मला शिवसेनेत प्रवेश करण्याबाबत आग्रह धरला होता. अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाल्याने मला शिवसेना पक्षात घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षप्रवेश करावा, यासाठी आढळराव पाटील आग्रही होते.’’

सर्वांना एकत्र आणणार
आमदार सोनवणे म्हणाले, ‘‘माजी उपजिल्हा प्रमुख सुनील मेहेर, अनिल मेहेर, नेताजी डोके, विश्‍वास आमले आदी पदाधिकारी शिवसेना सोडून गेले आहेत. त्यांच्यासह शिवसेनेतील सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्र आणून शिवसेना पक्षाची ताकद वाढवणार असून, लोकसभा निवडणुकीत एक लाखाचे मताधिक्‍य तालुक्‍यात मिळवून देणार आहे.’’ तसेच बुचके यांच्याबाबत सोनवणे म्हणाले, ‘‘पक्षात बुचके व त्यांच्या समर्थकांना सन्मानाची वागणूक दिली जाईल. त्यांनी नाराज न होता माझ्याबरोबर एकत्र येऊन पक्षासाठी काम करावे. भविष्यात त्यांना महामंडळासारखे पद देण्यासाठी मी प्रयत्न करील.’

आशा बुचके यांच्या निर्णयाकडे लक्ष
शरद सोनवणे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे आमदारकीसाठी शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या बुचके यांच्या राजकीय भवितव्याला सुरुंग लागला आहे. बुचके यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्या कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वपक्षीय नेत्यांचे आता लक्ष लागले आहे. त्यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केल्यास लोकसभा निवडणुकीत आढळराव पाटील यांना त्याचा काही प्रमाणात फटका बसण्याची शक्‍यता आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत मी मोठ्या मताधिक्‍याने निवडून येणार आहे. राज्यात युतीची सत्ता आल्यास तालुक्‍याच्या विकासासाठी पर्यटन मंत्रिपद द्यावे, अशी मागणी मी उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली असून, त्यांनी अनुकूलता दाखवली आहे.
 - शरद सोनवणे, आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com