शशिकांत सातव अंटार्टिकाच्या खडतर मोहिमेवर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

"नुकताच सूपरमून पाहण्यास मिळाला. परंतु, अंटार्टिकावरती नेहमीच सूपरमून असतो. तेथून चंद्रही अगदी जवळ दिसतो. सूर्योदयाचे नजारेच असतात. सूर्यप्रकाश आणि चंद्रप्रकाश बर्फावरून परावर्तित झाल्यानंतर दिसणारी विविध रंगाची उधळण स्वर्गसुखाची अनुभूती देते.

पुणे : ताशी 50 ते 100 किलोमीटरच्या वेगाने घोंगावणारे शीत वारे, चार महिने दिवस अन्‌ चार महिने रात्र, उणे 30 अशांपेक्षाही जास्तीची हाडे गोठावणारी थंडी, जिकडे पहावे तिकडे फक्त बर्फच बर्फ, कधीही आणि कोणत्याही ठिकाणी हिमसख्लन होण्याचा धोका, अशा अनंत अडचणींवर मात करून 33 वी अंटार्टिका मोहीम यशस्वी केलेले वाघोली (ता. हवेली) येथील शशिकांत ज्ञानोबा सातव यांची 36 व्या अंटार्टिका मोहिमेसाठी निवड झाली आहे. 
भारताने अंटार्टिकावर उभारलेल्या "मैत्री' या प्रकल्पावर ओझोनचे प्रमाण, हवामानातील बदल, भूगोल, जीवशास्त्र आणि इतर विषयांवर सखोल संशोधन केले जाते. त्यासाठी "एनसीएओर'मार्फत (National Centre for Antarctic and Ocean Research) दरवर्षी सुमारे 13 महिन्यांची अंटार्टिका मोहीम (indian scientific expedition to antarctica) आखली जाते. या मोहिमेमध्ये शशिकांत सातव यांची दुसऱ्यांदा निवड झाली आहे. ते पुण्यातील भारतीय हवामान विभागाच्या कार्यालयात सेवेत आहेत. या मोहिमेसाठी "डीआरडीओ', "आयआयजी', "एनपीएल', "जीएसआय' आणि "आयएमडी' आदी संस्थांच्या एकूण 25 सदस्यांचा एक गट अंटार्टिकावर जात असतो. त्यामध्ये ते संशोधक म्हणून सहभागी होत आहेत. 
शशिकांत सातव हे मूळचे वाघोली येथील असून, वयाच्या सहाव्याच वर्षीच त्यांच्यावरील वडिलांचे छत्र हरपले होते. त्यानंतर त्यांनी आजोळी मुळशी तालुक्‍यातील भुकूम येथे राहून पिरंगुट येथे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पदवीचे शिक्षण पुण्यातील स.प. महाविद्यालयात; तर पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पुण्यातीलच वाडिया महाविद्यालयात पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी भारतीय हवामान खात्यात संशोधक म्हणून सेवेला सुरवात केली. भारत सरकारने विविध संशोधनासाठी अंटार्टिकावर सुरू केलेल्या प्रकल्पासाठीच्या 33 व्या मोहिमेत त्यांना काम करण्याची संधी मिळाली होती. आता पुन्हा त्यांची निवड झाली आहे. 
या मोहिमेत सहभागी होण्यासाठी आणि अंटार्टिकावरील हवामानाशी जुळवून घेण्यासाठी या सदस्यांना इंडो- तिबेट सीमा सुरक्षा दलाकडून उत्तराखंडीमधील बद्रिनाथ परिसरात विशेष प्रशिक्षण देण्यात येते. तसेच, दिल्लीतील "एम्स' रुग्णालयात शारीरिक तपासणी केली जाते. त्यानंतरच या मोहिमेसाठी निवड केली जाते. तसेच, सहभागी सभासदांना गोव्यातही विशेष प्रशिक्षण दिले जाते. 

थरारक व सुखद अनुभव 
सातव यांनी मागील मोहिमेत अनेक थरारक अनुभव मिळाले. तसेच, अंटार्टिकावरील निसर्गाचा विविध अविष्कारही पाहण्यास आणि अनुभवण्यास मिळाल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, "नुकताच सूपरमून पाहण्यास मिळाला. परंतु, अंटार्टिकावरती नेहमीच सूपरमून असतो. तेथून चंद्रही अगदी जवळ दिसतो. सूर्योदयाचे नजारेच असतात. सूर्यप्रकाश आणि चंद्रप्रकाश बर्फावरून परावर्तित झाल्यानंतर दिसणारी विविध रंगाची उधळण स्वर्गसुखाची अनुभूती देते. तसेच, येथे प्रत्येक पावलावर हिमसख्लनाचा धोका असतो. अशावेळी बद्रिनाथ परिसरातील प्रशिक्षण उपयोगाला येते. सुमारे वर्षभर कुटुंबापासून दूर राहत असतो, मात्र आधुनिक संपर्क साधनांमुळे आता संपर्क कायम राहतो.''
 

Web Title: shashikant satav on antartica tour