तिने व तिच्या कुटुंबीयांनी पतीपासून आजार लपवला अन्...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 फेब्रुवारी 2020

लग्नापूर्वी दहा वर्षांपासून फिट येत असल्याची बाब तिने व तिच्या कुटुंबीयांनी पतीपासून लपवीत लग्न लावून दिले. मात्र लग्नानंतर चार महिन्यांतच तिचा हा आजार उघड झाला. त्यामुळे पत्नीने फसवणूक केल्याने हे लग्न अवैध ठरवून ते रद्द करण्यासाठी पतीने येथील कौटुंबिक न्यायालयात दाखल केलेला दावा न्यायालयाने मंजूर केला आहे.

पुणे - लग्नापूर्वी दहा वर्षांपासून फिट येत असल्याची बाब तिने व तिच्या कुटुंबीयांनी पतीपासून लपवीत लग्न लावून दिले. मात्र लग्नानंतर चार महिन्यांतच तिचा हा आजार उघड झाला. त्यामुळे पत्नीने फसवणूक केल्याने हे लग्न अवैध ठरवून ते रद्द करण्यासाठी पतीने येथील कौटुंबिक न्यायालयात दाखल केलेला दावा न्यायालयाने मंजूर केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

फसवणूक केलेले लग्न बेकायदा ठरवून ते रद्द करण्यासाठी हिंदू विवाह कायद्याच्या कलम १२ नुसार न्यायालयात दाद मागता येते. त्यानुसार पती पवन यांनी पत्नी रेश्‍मा यांच्याबरोबर झालेले लग्न रद्द करण्यासाठी अर्ज केला होता. याबाबत सविस्तर माहिती अशी की, रेश्‍मा यांना लग्नाच्या आधीपासून फिट येत होती. मात्र, ही बाब कोणाला सांगितली तर आपले लग्न होणार नाही या भीतीने त्यांनी ही गोष्ट लपवून ठेवत पवन यांच्याशी लग्न केले. मात्र, लग्नानंतर चार महिन्यांतच पवन यांना ही बाब समजली. त्यामुळे ते तिला डॉक्‍टरकडे घेऊन गेले. डॉक्‍टरांनी तिच्यावर सुरू असलेल्या उपचारांची सर्व माहिती पवन यांना दिली. हा सर्व प्रकार उघड झाल्यानंतर मला फसवून हे लग्न करण्यात आले आहे. त्यामुळे ते रद्द करण्यात यावे, असा दावा पवन यांनी ॲड. सुनीता जंगम यांच्यामार्फत दाखल केला होता. 

पुणेकरांसाठी खुशखबर! वर्षाभरात पीएमपीला मिळणार 984 बसचा बूस्टर! 

ॲड. जंगम यांनी रेश्‍मा यांच्यावर आधीपासूनच उपचार सुरू असल्याचे वैद्यकीय पुरावे न्यायालयात सादर केले. त्यामुळे फिट येत असल्याचे सिद्ध झाले. या पुराव्यांचा विचार करत न्यायालयाने हे लग्न रद्द ठरवले. पवन यांचा इंटेरिअर डिझायनिंगचा व्यवसाय आहे, तर रेश्‍मा या गृहिणी आहेत. लग्न झाल्यानंतर एका वर्षांच्या आतच ते विभक्त झाले आहेत.

लग्न हे एकमेकांच्या विश्‍वासावर अवलंबून असते. सुरुवातीच्या काळातच असा विश्‍वासघात केला तर जोडीदार कायद्याची मदत घेतो. लग्न ठरवताना ही विश्‍वासार्हता जपत पारदर्शकता ठेवली पाहिजे. आपला जोडीदार एखादी बाब स्वीकारू शकतो. त्यामुळे भविष्यातील धोके टाळण्यासाठी काहीही लपवून न ठेवता सर्व काही लग्नापूर्वीच एकमेकांना सांगितले पाहिजे. जाणीवपूर्वक खोटे सांगितले तर साथीदाराची निराशा होत असते. 
- ॲड. सुनीता जंगम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: She and her family hid the illness from her husband