तब्बल सोळा वर्षांनंतर दहावी पासचे स्वप्न साकार!

कृष्णकांत कोबल
शुक्रवार, 22 जून 2018

महाविद्यालयातील सफाई काम, कौटुंबिक जबाबदारी, सकाळ संधाकाळी खानावळ चालवून त्यांनी दहावीच्या परीक्षेचा जसा जमेल तसा अभ्यास केला...

मांजरी - जिद्द, चिकाटी व महत्वाकांक्षा असेल तर आपली स्वप्ने केव्हाही साकार होऊ शकतात. येथील मनीषा रासकर-वाघ यांनी पाहिलेले दहावी पासचे स्वप्न त्यांनी तब्बल सोळा वर्षांनी आकारास आणून ते सिध्द केले आहे.

मनीषा यांचे 2002 साली लग्न होऊन संसाराची जबाबदारी आल्याने त्यांचे शिक्षण बंद झाले होते. शिक्षण बंद झाल्याची खंत त्यांना कायम टोचत राहिली होती. कौटुंबिक जबाबदारी, आर्थिक टंचाई यामुळे ही खंत पूर्ण करण्यासारखी परिस्थितीही नव्हती. त्यामुळे मनात असूनही त्या शिक्षण घेऊ शकत नव्हत्या. 

येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयात गेल्या चार वर्षापासून त्या रोजंदारीवर सफाई कामगार म्हणून काम करीत आहेत. महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण पाहून त्यांना आपण पुढील शिक्षण घेऊ न शकल्याचे वाईट वाटत असे. तसा विचारही त्या आपल्या सहकाऱ्यांना बोलून दाखवत. सर्व सहकारी सकारात्मक असल्यामुळे त्यांच्या प्रेरणेतून मनीषाने सतरा नंबरचा फॉर्म भरून दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

महाविद्यालयातील सफाई काम, कौटुंबिक जबाबदारी, सकाळ संधाकाळी खानावळ चालवून त्यांनी दहावीच्या परीक्षेचा जसा जमेल तसा अभ्यास केला. सोळा वर्षांच्या खंडानंतर परीक्षेसाठी सिध्द होणे त्यांना अवघड जात होते. मात्र, तरीही त्यांची जिद्द आणि ध्येय्य कायम राहिल्याने त्यांनी परिक्षा दिली व 56.40 टक्के गुण संपादन करून यश मिळविले. या यशानंतर मनीषा यांनी वाणिज्य शाखेतून पदवीधर होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

त्यांच्या या जिद्दीचे व यशाचे घरातील मंडळी, मैत्रिणी, सहकारी, नातेवाईक यांच्याकडून कौतुक होत आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शर्मिला चौधरी, उपप्राचार्य भाऊसाहेब बेंद्रे, डॉ. आनंद महाजन यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

"मला शिक्षणाची खूप आवड आहे. मात्र परिस्थितीमुळे खूप मर्यादा आल्या. सांसारिक जबाबदारी आल्यावर आशाच सोडली होती. सासऱ्यांच्या आजारात शेतीची वाताहत झाली. आर्थिक चणचण भासू लागल्यावर गाव सोडले. पती बिगारी काम करुन कसातरी संसाराचा गाडा चालू लागला. त्यांना हातभार लागावा म्हणून महाविद्यालयात काम करू लागल्यानंतर शैक्षणिक वातावरण पाहून पुन्हा प्रेरणा मिळाली आणि परीक्षा दिली. पती दत्तात्रय व मुलांनीही सहकार्य केले. माझ्या सासर-माहेरच्या सर्वांना आनंद झाला आहे. कोठेतरी लिपिक म्हणून किंवा इतर चांगल्या पगाराचे काम करता यावे , यासाठी आता वानिज्य शाखेत प्रवेश घेण्यासाठी अर्ज भरला आहे.'' 
- मनिषा रासकर-वाघ

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: she passed SSC exam after struggle of sixteen years