शेवाळवाडी डेपाे विकसित होणार

Bus-Depo
Bus-Depo

पुणे - केंद्र सरकारच्या ‘बस पोर्ट डेव्हलपमेंट’ अंतर्गत हडपरजवळील शेवाळवाडी येथील पीएमपीचा डेपो आराखडा सादर झाला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास केंद्र सरकारतर्फे संपूर्ण बस आगार पीएमपीला विकसित करून मिळणार आहे. या प्रकल्पांतर्गत आणखी तीन आगारांचे आराखडे केंद्र सरकारकडे सादर करण्यात येणार आहेत. 

देशातील प्रमुख शहरांतील सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना आखली आहे. त्यानुसार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयामार्फत ती राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत ‘ग्रीन फिल्ड डेव्हलपमेंट’ अंतर्गत पीएमपीला डेपोचा आराखडा पाठविण्यास सांगण्यात आले होते.

त्यानुसार पीएमपीने शेवाळवाडी येथील डेपोचा आराखडा पाठविला आहे. डेपोची सुमारे ९ एकर जागा असून, तेथून थेऊर, वाघोली, सासवड, स्वारगेट, पुणे स्टेशन, निगडी आदी मार्गांसाठी बस सुटतात. नव्या बसही याच आगारात उभ्या करण्यात येणार असल्याची माहिती पीएमपीच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी दिली. 

केंद्र सरकारच्या प्रकल्पांतर्गत सल्लागार नियुक्त करून त्याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्याची छाननी झाल्यावर सल्लागारामार्फत पुन्हा एकदा वाहतूक मंत्रालयाकडे तो जाईल आणि तेथे मंजुरीचा निर्णय होईल. देशातील प्रमुख शहरांतील एक डेपोचा या योजनेत समावेश असल्याचे गुंडे यांनी सांगितले. 

‘ब्राऊन फिल्ड’मधूनही आगारांचा विकास शक्‍य
ब्राऊन फिल्ड डेव्हलपमेंट अंतर्गत अस्तित्वात असलेल्या आगारांमधून एक किंवा दोन आगारांचाही विकास शक्‍य होणार आहे. त्यासाठीही आगारांची माहिती कळविण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार पीएमपी आढावा घेऊन दोन किंवा तीन आगारांची माहिती येत्या आठवड्यात केंद्र सरकारकडे पाठविणार आहे. या योजनेचाही संपूर्ण खर्च केंद्र सरकारकडून होणार असल्याचे नयना गुंडे यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com