पुणे - कारागृह मुख्यालयाचे येरवड्यात स्थलांतर!

दिलीप कुऱ्हाडे
सोमवार, 28 मे 2018

येरवडा (पुणे) : येरवडा खुल्या कारागृहाच्या साठ एकर शेतीमध्ये राज्य कारागृह महानिरीक्षकांचे कार्यालयाची अर्थात मुख्यालयाची नवीन वास्तू साकारणार आहे. भव्य इमारत, तुरूंग रक्षकांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंचे प्रशिक्षण केंद्र, प्रशिक्षणार्थींची निवासस्थान आदींचे बांधकाम पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ करणार आहे. यासाठी महामंडळाने साडेपाचशे कोटी रूपयांचा प्रस्ताव राज्य सरकारनकडे पाठविल्याची माहिती अधिकृतसुत्रांनी दिली.

येरवड्यात कारागृह प्रशासनाची पाचशे एकर जागा आहे. याजागेत येरवडा मध्यवर्ती कारागृह, खुले कारागृह, महिला कारागृह, शेती, दौलतराव जाधव तुरूंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, कवायत मैदान, तुरूंगाधिकारी निवासस्थाने, रक्षकांची वसाहत आदींचा समावेश आहे. येरवडा खुल्या कारागृहाच्या साठ एकर शेतीमध्ये कारागृह महानिरीक्षक कार्यालय अर्थात मुख्यालय उभारण्यासाठी वेगाने हालचाली सुरू आहेत. यासाठी राज्याच्या गृहविभागाने पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाला परवानगी दिल्याचे समजते. मात्र निधी खर्च करण्यासाठी उपलेखाशिर्ष नसल्यामुळे या कामाचे भूमिपूजन लांबल्याची चर्चा आहे.निधी खर्च करण्यासाठी गृहविभागाने धोरणात्मक बदल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

पोलिस गृहनिर्माण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीचे खुल्या कारागृहातील शेत जमिनीची पाहणी केली. खुल्या कारागृहाच्या शेती जमिनीतील साठ एकर जागेत महानिरीक्षक कार्यालयासह तुरूंगाधिकारी प्रशिक्षण केंद्र, प्रशिक्षणार्थींची निवासस्थाने, वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी निवासस्थाने, भव्य कवायत मैदान आदींचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपूर्वीच पोलिस गृहनिर्माण मंडळाने तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या जागेची मोजणी करून घेतली आहे. त्यामुळे लवकरच येथे भव्य इमारत उभी राहणार असून शासकीय मध्यवर्ती इमारतीमधील मुख्यालयाचे स्थलांतर होणार आहे.

गृहविभागातील पोलिस व कारागृह विभागातील सर्व बांधकामे यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) करीत होती. मात्र आता पोलिस आयुक्तालयातील सर्व पोलिस ठाणे, पोलिस कर्मचारी वसाहती, कारागृहांसह कारागृह कर्मचारी वसाहतींची बांधकाम, देखभाल व दुरुस्तीची कामे आता राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ करणार आहे. मात्र या निधीची तरतूद करण्यासाठी महामंडळाकडे उपलेखाशिर्षच नसल्यामुळे सध्या अडचण निर्माण झाली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shifting of jail headquarter to yerawada pune