धरणात उभ्या असलेल्या तीन होड्या, एक लाॅजला जलसमाधी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

दोन वर्षांपूर्वी धरणात बुडालेली नाव धरणाच्या पाण्यात कुजून गेली, पण जिल्हा परिषदेने दुसरी नाव दिली नाही, त्यामुळे स्वातंत्र्य पूर्व काळा पासून सुरू असलेला माळेगाव वाहनगाव दरम्यानचा नौका प्रवास बंद पडला आहे.

टाकवे बुद्रुक : स्थानिक पातळीवरील गावकऱ्यांनी योग्य दक्षता न घेतल्याने आणि प्रशासनाच्या दुर्लक्षतेने ठोकळवाडी धरणाच्या जलाशयात उभ्या असलेल्या तीन होड्या आणि एक लाॅजला अठरा वर्षात जलसमाधी घ्यावी लागली.

दोन वर्षांपूर्वी धरणात बुडालेली नाव धरणाच्या पाण्यात कुजून गेली, पण जिल्हा परिषदेने दुसरी नाव दिली नाही, त्यामुळे स्वातंत्र्य पूर्व काळा पासून सुरू असलेला माळेगाव वाहनगाव दरम्यानचा नौका प्रवास बंद पडला आहे. हा प्रवास बंद पडल्याने धरणाच्या अलिकडच्या व पलिकडच्या नागरिकांना, विद्यार्थ्यांना वीस किलोमीटरचा वळसा घालून जावे लागते.इतकेच नव्हे तर या दोन्ही गावांना जोडणारी पाऊलवाट बुजून गेली आहे. डाबरीकरणाचे पक्के रस्ते करताना पाऊलवाटांकडे कानाडोळा होत असल्याची खंत बुजुर्ग करू लागले आहेत. स्वतंत्रपूर्व काळात टाटा पाॅवरने ठोकळवाडी धरण बांधले,धरणाच्या अलिकडे पलिकडे दळणवळणाची सोय व्हावी म्हणून सुरूवातीला निळशी जवळून तर त्या नंतर माळेगाव वाहनगाव दरम्यान नावेची सोय केली.

रूपाजी बो-हाडे नावाडी बनले, पुढे त्यांचा मुलगा चंदर बो-हाडे हे देखील नावाडी झाले. वयाच्या ऐंशी वर्षा पर्यंत या बापलेकाने जनसेवा केली. सन २००० च्या सुमारास होडीच्या जागी लाॅज सेवा सुरू झाली. सरकारी कर्मचारी नेमला गेला, आठ तासाची ड्यूटी झाली. वर्षे दोन वर्षे लाॅज चालली पण नादुरूस्त झाल्याने पावसाळ्यात धरणाच्या कडेला उभी केलेल्या लाॅज मध्ये पाणी जाऊन ती पाण्यात बुडाली. वर्षेभर प्रयत्न केल्यावर लाॅजच्या जागी होडी आली रूपा बो-हाडेंचा नातू मारूती बो-हाडे नावाडी झाला. चार वर्षांत सन २००५ च्या सुमारास होडीत पाणी जाऊन धरणाच्या कडेला पावसात उभी ठेवलेली होडी बुडाली. पुन्हा नवी होडी आणली तीही दोन चार वर्षे चालली सन२००८ च्या सुमारास तिला ही जलसमाधी अशीच मिळाली. पुन्हा नागरिकांच्या गैरसोय झाली. पुन्हा नवी होडी आणली ती व्यवस्थित चालली, पण २०१६ ला तिला ही नजर लागली आणि तिला जलसमाधी मिळाली ती अद्याप तशीच आहे.

शासनाच्या लाखो रुपये किंमतीच्या वस्तू पाणूयात बुडाल्या पण याचे गांभीर्य ना अधिकाऱ्यांना आहे,ना गावकऱ्यांना, ना स्थानिक लोकप्रतिनिधींना.होडी पाण्यात बुडाल्याने गैरसोय होते ती तेथून वाहनगाव ,वडेश्वरला कामाला येणाऱ्या कामगारांचे,पाले,मोरमारेवाडी, करंजगाव, शिरदे ,कुसवली,सटवाईवाडीतील विद्यार्थ्यांचे, जे माळेगावच्या आश्रमशाळेत शिकत आहे. पंचक्रोशीतील नातेवाईकांची गैरसोय होते,त्यांना लेकीबाळांना ,बहिणीला, सूनांना,नातवंडांना भेटायला मोठा वळसा घालून जावे लागते.धरणाच्या अलिकडील डाहूली व पलिकडे माळेगाव ग्रामपंचायत आहे.त्यांनी नावाडयाला पुरेसे मानधन देणे अपेक्षित होते, किंवा टाटा पाॅवरने हा भार उचलायला हवा होता,धरणाच्या कडेला नाव किंवा होडी सुरक्षित ठेवण्याची, सांभाळण्याची जबाबदारी नावाडयाने स्वीकारली असती. जी जबाबदारी रूपा बोऱ्हाडे, चंदर बो-हाडे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून नव्वदच्या दशका पर्यत स्वीकारली. केवळ नावाडी नसल्याने तीन होड्या धरणात बुडाल्या. अजून किती दिवस हा नौका प्रवास ठप्प राहणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

मालेगावचे माजी सरपंच बाळासाहेब खंडागळे म्हणाले,"नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी या प्रवासाची गरज आहे. दोन वर्षांपूर्वी पाण्यात बुडालेली नाव अजून पाण्यातच आहे.आता तिची लाकडे कुजून गेली असतील.

Web Title: ship drowned in dhokalwadi dam