शिर्सुफळची शिरसाई देवी यात्रेला घटस्थापनेने सुरवात

संतोष आटोळे 
रविवार, 8 एप्रिल 2018

श्री शिरसाई देवी यात्रोत्सवाबाबत यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी घटस्थापनेने यात्रेला सुरवात होणार आहे. पाचव्या माळे दिवशी पासुन वाघ्यामुरळीचा कार्यक्रम व देवीचा छबीना मंदिर प्रदिक्षणेसाठी काढला जाईल.

शिर्सुफळ - संपूर्ण राज्यात एक जागृत देवस्थान म्हणुन प्रसिध्द असलेल्या व माकडांना देव माननाऱ्या बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथील श्री शिरसाई देवी यात्रेला सोमवार (ता. 9) पासून घटस्थापनेने सुरवात होत असुन मुख्य यात्रा गुरुवार (ता. 19) व शुक्रवार (ता. 20) ला संपन्न होणार आहे, अशी माहिती यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने देण्यात आली.

येथील श्री शिरसाई देवी यात्रोत्सवाबाबत यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी घटस्थापनेने यात्रेला सुरवात होणार आहे. पाचव्या माळे दिवशी पासुन वाघ्यामुरळीचा कार्यक्रम व देवीचा छबीना मंदिर प्रदिक्षणेसाठी काढला जाईल. मंगळवार (ता. 17) ला घटविर्सजन होणार आहे. या कालावधीत मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. बुधवार (ता. 18) ला अक्षयतृतीया आहे.व त्यानंतर गुरुवार व शुक्रवार (ता. 19 व 20 एप्रिल) ला मुख्य यात्रा होणार आहे. यामध्ये यात्रेच्या पहिल्या दिवशी गुरुवारी पहाटे पासुन देवी दर्शन, चोळीपातळ व दंडवत, तसेच संध्याकाळी परिसरातील विविध गावांच्या देवतांचे छबिने येणार आहेत. मध्यरात्री परंपरेप्रमाणे रावणगाव (ता. दौंड) यांचा नेत्रदिपक असा राक्षसदहन कार्यक्रम होणार आहे.

तर शुक्रवार (ता. 20) रोजी पहाटे पालखी गाव प्रदक्षिणेसाठी निघुन दुपारी मंदिरात विसावेल. या दोन दिवसाच्या कालखंडात शुक्रवार दुपारी तुकाराम खेडकरसह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर व संध्याकाळी रघुवीर खेडकर यांच्या लोकनाट्य तमाशाच्या मनोरंजन कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. यात्राकाळात पाणीपुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती, रस्ते, याबाबत भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जाणार असल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Shirsufalas Shirsai Devi Yatra Will Start Soon