esakal | शिरूर: निर्वीत सापडला १४ फूट लांबीचा दस्तऐवज
sakal

बोलून बातमी शोधा

14 feet document

शिरूर: निर्वीत सापडला १४ फूट लांबीचा दस्तऐवज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

न्हावरे : निर्वी (ता. शिरूर) येथील माजी उपसरपंच जयसिंगराव बाळासाहेब सोनवणे पाटील यांच्या राहत्या वाड्यात सुमारे २८० वर्षांपूर्वीचा पेशवेकालीन ऐतिहासिक दस्तावेज सापडला आहे. तो तब्बल १४ फूट लांबीचा आहे. दस्तऐवजाच्या सुरुवातीच्या २१ ओळी फारसी असून उर्वरित मजकूर हा मोडी लिपीत लिहिलेला आहे. हा कागद ''१५ शाबान सन ११५० फसली'' अर्थात १६ ऑक्टोबर १७४० रोजीचा आहे. त्यामध्ये ''महजरनामा'' म्हणजे (करारनामा) अथवा पंचांसमोर साक्षीदारांनी आपल्या सह्यानिशी एखाद्या प्रकरणाबाबत दिलेला करार केलेला उल्लेख आहे.

हेही वाचा: कुत्र्याचा राग मालकावर; कारची काच फोडून ४४ हजार लंपास

निर्वीतील येसाजी रखमाजी सोनवणी यांना निर्वी हे गाव छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू छत्रपती शाहू महाराज यांनी इनाम दिला होता. येसाजी सोनवणे, सोमाजी सोनवणे याचबरोबर अनेक सोनवणे वीरांचे उल्लेख कागदपत्रांतून वारंवार येतात. त्यांच्या पराक्रमाची साक्ष म्हणून अनेक समाध्या व वीरगळी निर्वी गावात पाहायला मिळतात. निर्वी येथील सोनवणे यांच्या दफ्तरात इतरही शेकडो कागदपत्रे आहेत. त्यात पेशवे, ग्वाल्हेरचे दौलतराव शिंदे व सटवाजीराव जाधवराव यांच्या पत्रांबरोबर हिशेब, यादी, कर्जरोखे इत्यादी कागद आहेत. - हर्षद रमेश देशमुख, इतिहास व मोडी अभ्यासक

कागदपत्रात काय आहे उल्लेख?

निर्वीचे दमाजी आबाजी पाटील सोनवणी यांनी श्रीगोंदा (नगर) जिल्ह्यातील बोरी गावची निम्मी पाटीलकी शेळके व लगड परिवाराकडून विकत घेतल्याची नोंद या महजरनाम्यातून मिळते. हा महजरनामा तत्कालीन परगण्याचे ठिकाण शिरूर तालुक्यातील करडे या ठिकाणी झाल्याचा कागदपत्रात उल्लेख आहे.

त्यावेळी या महजरनाम्याचे पंच म्हणून देशमुख, देशपांडे व काही गावांचे पाटील व कुलकर्णी मंडळी उपस्थित होती. यात एक फारसी व जुन्नर प्रांताचे व करडे परगण्याचे तुकोजी बिन त्रिंबकजी हांडे देशमुख व श्रीगोंद्याचे पाटील राणोजी शिंदे यांचा शिक्का आपल्याला पहावयास मिळतो. या कागदपत्रात बोरी (ता. श्रीगोंदा) येथील पाटील वतनाच्या मानपान व हक्क उत्पन्न याबद्दल विस्तृत माहिती दिली आहे.

त्यातुन तत्कालीन सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक परिस्थितीची जाणीव होते. दरम्यान, सोनवणे यांच्या दफ्तरातील निवडक कागदपत्राचा अभ्यास करून ऐतिहासिक संदर्भग्रंथ प्रकाशित करण्याचा मानस असल्याचे अभ्यासक हर्षद देशमुख ''सकाळ''शी बोलताना सांगितले.

loading image
go to top