ठरता ठरेना ‘राष्ट्रवादी’चा उमेदवार

Shirur
Shirur

शिवसेना-भाजप युती झाल्याने खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा मार्ग सुकर झाला असतानाच; प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण? याबाबत शिरूर मतदारसंघात उत्सुकता आहे. दूरचित्रवाणी मालिकेतून संभाजीराजांच्या भूमिकेतून घराघरांत पोचलेले अभिनेते अमोल कोल्हे यांचे नावे उमेदवार म्हणून पुढे येत आहे. तसे झाले तर येथील लढत तुल्यबळ होऊ शकते.

खासदार शिवाजीराव आढळराव यांनी खेड मतदारसंघातून खासदारकीचा शुभारंभ केला आणि पुढे पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आलेल्या शिरूर मतदारसंघातून सलग दोनदा विजय मिळवीत ‘हॅटट्रिक’ केली. अशोक मोहोळ, विलास लांडे आणि देवदत्त निकम यांचा एकतर्फी पराभव केल्यानंतर, यंदा चौकार मारण्यास ते सज्ज असले; तरी राष्ट्रवादीकडून प्रबळ उमेदवार येईल आणि त्यांचा ‘क्‍लीन बोल्ड’ होईल, अशी आशा राष्ट्रवादीतील सच्च्या कार्यकर्त्यांना आहे. आढळराव यांचा कमी झालेला संपर्क आणि मतदारसंघातील प्रलंबित कामे त्यांना अडचणीची ठरू शकतात. 

माजी आमदार विलास लांडे यांनी ‘फ्लेक्‍स प्रचार’ सुरू केलाय; तथापि त्यांची उमेदवारी पक्षाने जाहीर केलेली नाही. स्थानिक नेते लढण्यास धजावत नसल्याने, खुद्द अजित पवार यांनी ‘कुणी तयार नसेल, तर मीच लढतो’, असे वक्तव्य करून त्रागा व्यक्त केला. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील उमेदवार असतील तर विजय मिळू शकतो, असा पक्षांतर्गत सूर आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्याही नावाची चर्चा आहे.

तथापि, दोघेही आमदारकीसाठीच इच्छुक असल्याने पक्षाला अन्य पर्याय शोधावे लागत आहेत. अभिनेते अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने त्यांच्या उमेदवारीची दाट शक्‍यता आहे. तथापि, राज्य स्तरावरील ‘स्टार प्रचारक’ की शिरूरचा उमेदवार असे दोन पर्याय त्यांच्यासमोर आहे. 
भाजप-शिवसेनेची युती होण्यापूर्वी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मंगलदास बांदल यांनी जय्यत तयारी केली होती. तथापि, त्यांची आता कोंडी झाली आहे. ते कोणता झेंडा हाती घेतात, याबाबतदेखील उत्सुकता आहे.

पालघरच्या बदल्यात शिरूरची जागा आम्हांला मिळावी, अशी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. त्यासाठी त्यांनी वरिष्ठ पातळीपर्यंत ‘फिल्डींग’ लावली आहे.

२०१४ चे मतविभाजन
    शिवाजीराव आढळराव पाटील (शिवसेना) ः ६,४३,४१५ (विजयी)
    देवदत्त निकम (राष्ट्रवादी काँग्रेस) ः ३,४१,६०१
    अशोक खांडेभराड (मनसे) ः ३६,४४८
    सोपानराव निकम (आप) ः १६,६७४

मतदारसंघातले प्रश्‍न
    महामार्गावरील वाहतूक कोंडी, एमआयडीसीतील सुरक्षा
    शिवाजी महाराज जन्मस्थळ (जुन्नर), संभाजी महाराज बलिदान स्थळ (वढू बुद्रुक) यांचा विकास
    पुरंदर तालुक्‍यात विमानतळ गेल्याने निर्माण झालेली स्थिती
    बैलगाडा शर्यतीच्या आयोजनातील अनिश्‍चितता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com