Loksabha Election : वाघोलीत शांततेत व सुरळीत उत्साहात मतदान; मतदार यादीतून नावे गायब झाल्याने मतदारांचा संताप

शिरूर लोकसभा मतदार संघासाठी वाघोलीत शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. सोसायटी धारक मतदार सकाळीच मतदानासाठी बाहेर पडल्याने मतदार केंद्रात रांगा दिसून आल्या.
loksabha election
loksabha electionsakal

वाघोली - शिरूर लोकसभा मतदार संघासाठी वाघोलीत शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. सोसायटी धारक मतदार सकाळीच मतदानासाठी बाहेर पडल्याने मतदार केंद्रात रांगा दिसून आल्या. सर्वच मतदारामध्ये उत्साह दिसून आला. वाघोलीत यंदा चार केंद्र वाढवून सहा केंद्रात मतदानाची सोय करण्यात आली होती.

वाघोलीत ६०,६९४ मतदारांची संख्या आहे. सहा केंद्रा पैकी सातव हायस्कूल केंद्रात सतत गर्दी होती. मतदार स्वतःचे ओळख पत्र व प्रतिनिधी कडून मतदार यादीतील भाग क्रमांक व खोली क्रमांक घेवून केंद्रावर येत होते. केंद्राच्या १०० मीटर परिसरात अनेक निर्बंध असल्याने मतदार ते पाळत होते.

अनेकांना खोल्या शोधाव्या लागत असल्याने मतदार पोलीस कर्मचारी, प्रतिनिधी, कार्यकर्ते यांचा आधार खोली शोधण्यासाठी घेत होते. मतदान झाल्यावर फोटो व सेल्फी काढून ते सोशल मीडियावर टाकण्यासाठी मतदारांची लगबग होती.

अनेक जण कुटुंबासह मतदानासाठी आले होते. रांगेत बराच वेळ थांबावे लागत असल्याने नाराजीही व्यक्त होत होती. वाघोलीची मतदानाची टक्केवारी शिरूर लोकसभा मतदार संघा पेक्षा जास्त होती. यामुळे मतदानसाठी झटणाऱ्या पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. दुपारी एक वाजेपर्यंत शिरूर लोकसभा मतदार संघात २४.१७ तर वाघोलीत ३० टक्यापेक्षा अधिक मतदान झाले होते.

भर दुपारीही मतदानासाठी मतदार बाहेर पडल्याचे दिसून आले. एकूणच मतदारांचा उत्साह, टक्केवारी, सोसायटी मधील बाहेर पडलेला मतदार यावरून कोण बाजी मारणार यावर ठिकठिकाणी चर्चाही रंगली होती. शिरूर लोकसभा मतदार संघात महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील व महाविकास आघाडीचे डॉ अमोल कोल्हे यांच्यात प्रमुख लढत आहे. यासह ३० उमेदवार रिंगणात होते.

गजराबाई सीताराम पाटोळे (वय-९०) -

'लय वेळा मतदान केले हाय. मला जर मतदानाचा हक्क हाय तर मी मतदान का नाय करायचे. हक्क हाय तर बजावणारच. समदयानी मतदान केले पाहिजे.' आजी सकाळीच आपल्या मुलाबरोबर मतदानासाठी केंद्रावर आल्या होत्या.

संतोष यादव (वय-२०, प्रथमच मतदान) -

'मला मतदाना बाबत खूपच उत्सुकता होती. कधी मतदान करायला मिळेल असे वाटत होते. यंदा संधी मिळाली. मतदानाची प्रक्रिया प्रथमच अनुभवली. मतदान केल्याने  माझे मतही सरकार निवडण्यात महत्वाचे ठरेल याचा खुपच आनंद झाला.' संतोष हा कोरेगाव भीमा येथील डिलाईट फार्मसी इन्स्टीट्युट मध्ये डी फार्मसी च्या पहिल्या वर्गात शिकतो.

जुबेदा मुगल (वय-२२) (प्रथमच मतदान) -

'लोकशाहीत प्रथमच मला मतदान करता आले. याचाच खूप आनंद झाला. आता पर्यंत निवडणुकीच्या प्रक्रियेबाबत ऐकत होते. आज मतदानचा हक्क मिळाल्याने प्रक्रिया अनुभवता आली. तरुणांनी कधीच  मतदानाचा संधी गमवू नये.' जुबेदा ही  कँप मधील इनामदार महाविद्यालयात बीए च्या द्वितीय वर्षात शिक्षण घेते.

रेखांश चोप्रा, उमंग चोप्रा (परदेशातून मतदानासाठी आलेले मतदार) -

'नोकरी निमित परेदशात असलो तरी मतदानाचा हक्क बजविता आला यामध्ये खुप आनंद मिळाला. लोकशाहीत प्रत्येक मताला किमत असते. यामुळे प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजाविला पाहिजे. 'दोघेही १० वर्षापासून सिंगापुर येथे राहतात. ते खाजगी नोकरीत आहेत. त्यांचे आई वडील वाघोलीत वास्तव्यास आहेत. कुटुंबच मतदानासाठी आले होते.

मतदार यादीतून नावे गायब -

मतदाना साठी केंद्रावर आलेल्या अनेक मतदारांची यादीतील नावेच गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी त्यांची नावे शोधण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र ती सापडली नाही. यामुळे त्यांना मतदानाचा हक्क बजाविता आला नाही. त्यांनी याबाबत संताप व्यक्त केला. तर अनेक मतदारांनी अगदी जिल्हाधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून संताप व्यक्त केला. आमच्या सोसायटीतील किमान २५ नावे गायब असल्याचे ऐश्वर्या लक्ष्मी सोसायटीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

मतदानाला कुटुंबाची ताटातूट -

अनेक कुटुंब एकत्रित मतदान करण्यासाठी केंद्रावर येत होते. मात्र पतीचे नाव एका केंद्रात, पत्नीचे दुसऱ्या तर मुलाचे तिसऱ्या केंद्रात आढळून आल्याने त्यांना एकत्रीत मतदान करता आले नाही. ऐनवेळी त्यांना दुसऱ्या केंद्रावर जावे लागले. केंद्र दुर असल्याने अनेक मतदारानी मतदान न करताच पुन्हा घर गाठले.

मतदान केंद्र व परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामुळे मतदान शांततेत पार पडले. पोलीसांनी प्रतिनिधींनाही केंद्र परिसरात थांबू दिले नाही. केवळ मतदार मतदान केंद्रात मतदानासाठी जात होते. लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास करे, पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे इतर अधिकारी यांनी कडक बंदोबस्त ठेवला. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त विजय मगर यांनीही वाघोली केंद्रात फिरून आढावा घेतला.

अधिकारी कोंडी काढण्यासाठी रस्त्यावर -

मतदारांच्या गर्दी मुळे पुणे नगर महामार्गावर सतत कोंडी होत होती. मतदार महामार्गालगत वाहने पार्क करीत होते. यामुळे कोंडी वाढत होती. अखेर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास करे, लोणी कंद वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांनी कर्मचाऱ्या सह रस्त्यावर उतरून वाहने हटविली व कोंडी दूर केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com