शिरूरसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ८ दिवसांत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

नारायणगाव - शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव पुढील आठ दिवसांत निश्‍चित केले जाईल. मात्र पवार कुटुंबीयांपैकी कोणीही शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढविणार नाही, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. 

नारायणगाव - शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव पुढील आठ दिवसांत निश्‍चित केले जाईल. मात्र पवार कुटुंबीयांपैकी कोणीही शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढविणार नाही, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. 

जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नारायणगाव (ता. जुन्नर) येथे गुरुवारी (ता. २९) कार्यकर्ता मेळावा व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी खासदार सुळे यांनी तालुका बूथ कमिटीचा आढावा घेऊन आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसंदर्भात पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. खासदार सुळे म्हणाल्या, ‘‘सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले असून, राज्यात अस्थिरतेची स्थिती निर्माण झाली आहे. जीएसटी, नोटाबंदीमुळे कारखाने बंद पडले असून, सुशिक्षित बेरोजगारीचा प्रश्‍न राज्यात निर्माण झाला आहे.

बाजारभावाअभावी अन्नधान्याला देव मानणारा शेतकरी कांदा, टोमॅटोसह इतर शेतमाल रस्त्यावर टाकून निषेध व्यक्त करत आहेत.’’

मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष अतुल बेनके, तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार, महिला तालुका अध्यक्षा सुरेखा वेठेकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, शरद लेंडे, अलकाताई फुलपगार, राजश्री बोरकर, गुलाबराव नेहरकर, किशोरशेठ दांगट, सय्यद पटेल, रमेश भुजबळ उपस्थित होते.
 या वेळी बेनके, पांडुरंग पवार, मेहेर, बोरकर, लेंडे, दादाभाऊ बगाड यांनी मनोगत व्यक्त केले. अरविंद लंबे यांनी सूत्रसंचालन केले.

पदाधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल
खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या चौकशीत तालुक्‍यात बूथ कमिट्यांची स्थापना केली नसल्याचे स्पष्ट झाले. यामुळे नाराज झालेल्या सुळे यांनी जमत नसेल, तर मी माझे कार्यकर्ते पाठवते, असे खडेबोल तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार व पदाधिकाऱ्यांना सुनावले. तीन डिसेंबरपूर्वी बूथ कमिट्यांची स्थापना करण्याचे आदेश त्यांनी दिले. 

खासदाराने पंधरा वर्षांत लोकहिताचे कोणतेही मोठे काम केले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांना न्याय देणारा आहे. आगामी निवडणूक जिंकण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी आपसांतील मतभेद बाजूला ठेवावेत. सोशल मीडियाचा नियोजनपूर्वक वापर करावा.
-प्रदीप गारटकर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस 

Web Title: Shirur Loksabha NCP Candidate for shirur politics supriya sule