शिरूरचे खासदार फ्लेक्‍सबाजीत पुढे - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

शिरूर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या आज येथे झालेल्या हल्लाबोल आंदोलनात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना टीकेचे लक्ष्य केले. ‘फ्लेक्‍सबाजीत पुढे असलेला हा गोडबोल्या खासदार आहे,’ अशा शब्दांत अजित पवार यांनी टीकास्त्र सोडले. 

शिरूर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या आज येथे झालेल्या हल्लाबोल आंदोलनात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना टीकेचे लक्ष्य केले. ‘फ्लेक्‍सबाजीत पुढे असलेला हा गोडबोल्या खासदार आहे,’ अशा शब्दांत अजित पवार यांनी टीकास्त्र सोडले. 

अजित पवार म्हणाले, ‘‘या परिसराचा कायापालट पवारसाहेबांनी केला. एमआयडीसी आणली. शेतीसाठी पाणी, विजेची सोय केली. एवढे करूनही खासदार मात्र विरोधी निवडून देता, याचे गणितच समजत नाही. तुमच्या खासदाराला निवडणुका आल्या की बैलगाड्यांच्या शर्यती आठवतात. बैलगाडा शर्यती हा इथल्या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने त्याभोवतीच ते फिरत बसतात. भावनिक राजकारण करून जनतेला गंडवतात. बैलगाडा शर्यतीचा विषय कोर्टात असतानाच बैलगाडा शर्यती सुरू झाल्या, त्यासाठी मीच कसा पाठपुरावा केला, याबाबतचा त्यांचा फार्स वेळोवेळी इथल्या जनतेने अनुभवला आहे. कशात काही नसताना बैलगाडा शर्यती सुरू झाल्याचे फ्लेक्‍स खासदारांच्या नावाने मतदारसंघात झळकतात. वर्तमानपत्रांतून बातम्या येतात. पण, प्रत्यक्षात बैलगाडा शर्यती सुरू झाल्या का? हे सुज्ञ जनतेने आणि गाडाशौकिनांनी बघावे. केंद्रात आमचे सरकार आणा, बैलगाडा शर्यती सुरू केल्या नाही; तर नावाचा अजित पवार नाही.’’

‘बारामतीपेक्षा जास्त निधी देऊ’
‘‘या लोकसभा मतदारसंघात ताकद आपली, लोक आपले असताना पराभव का होतो, याचे आत्मपरीक्षण झाले पाहिजे. संघटनेतील लोकांत गडबड असेल; तर त्याबाबत दुरुस्ती झाली पाहिजे. शिरूरला खासदार व आमदार विरोधी आहेत, याची पक्षीय पातळीवर गांभीर्याने दखल घ्यावी. कार्यकर्त्यांच्या मनातील भावना जाणून घेऊन लोकांच्या मनातील उमेदवार द्यावा. शिरूरचा खासदार राष्ट्रवादीचा करा, बारामतीपेक्षा या मतदारसंघाच्या विकासासाठी जास्त निधी देऊ,’’ असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.  

Web Title: shirur mp flex politics ajit pawar