खेडचे सभापतिपद पहिल्यांदाच शिवसेनेकडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

राजगुरुनगर - खेड तालुक्‍याच्या इतिहासात पहिल्यांदाच पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकला. त्यासाठी शिवसेनेला काँग्रेसची मदत घ्यावी लागली. सभापतिपदी शिवसेनेच्या सुभद्रा शिंदे यांची; उपसभापतिपदी काँग्रेसचे अमोल पवार यांची बिनविरोध निवड झाली. 

राजगुरुनगर - खेड तालुक्‍याच्या इतिहासात पहिल्यांदाच पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकला. त्यासाठी शिवसेनेला काँग्रेसची मदत घ्यावी लागली. सभापतिपदी शिवसेनेच्या सुभद्रा शिंदे यांची; उपसभापतिपदी काँग्रेसचे अमोल पवार यांची बिनविरोध निवड झाली. 

पंचायत समितीच्या सभागृहात शिवसेनेच्या सुभद्रा शिंदे यांचा अर्ज दाखल झाला. त्यांना ज्योती अरगडे सूचक होत्या. भाजपच्या धोंडाबाई खंडागळे यांचा सभापतिपदाचा अर्ज सूचक चांगदेव शिवेकर यांनी दाखल केला. उपसभापतिपदासाठी काँग्रेसचे अमोल पवार (सूचक- अंकुश राक्षे), राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण चौधरी (सूचक- वैशाली गव्हाणे) आणि भाजपचे चांगदेव शिवेकर (सूचक- धोंडाबाई खंडागळे) यांचे अर्ज या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी सुनील गाढे यांच्याकडे दाखल झाले. 

खेड पंचायत समितीत एकूण १४ सदस्य आहेत. या निवडणुकीत शिवसेनेचे ७, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४, भाजपचे २ आणि काँग्रेसचा १ सदस्य निवडून आला आहे. त्यापैकी काँग्रेसचे एकमेव सदस्य असलेल्या अमोल पवार यांच्या अर्जावर सूचक म्हणून शिवसेनेचे अंकुश राक्षे यांनी सही केल्याने शिवसेना आणि काँग्रेस आघाडी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होईल, असे संकेत होते. 

सर्व नवनिर्वाचित सदस्यांची सभा दुपारी २ वाजता बोलाविली होती. त्यामुळे पीठासीन अधिकारी सुनील गाढे यांनी त्यावेळी माघारीसाठी १५ मिनिटांची मुदत ठेवली. सभेला सर्व १४ सदस्य उपस्थित झाले. 

गाढे यांनी आलेल्या अर्जाची माहिती देऊन माघारीची मुदत सांगितली. त्यावर सभापतिपदाचा अर्ज धोंडाबाई खंडागळे यांनी मागे घेतला आणि उपसभापतिपदाचे अर्ज अरुण चौधरी आणि चांगदेव शिवेकर यांनी मागे घेतले. त्यामुळे सभापती म्हणून सुभद्रा शिंदे आणि उपसभापती म्हणून अमोल पवार हे बिनविरोध निवडून आल्याचे गाढे यांनी जाहीर केले. 

Web Title: shiv sena first time in rajgurunagar