शिवसेनेला मिळणार औटघटकेचे विरोधी पक्षनेते पद 

उत्तम कुटे
सोमवार, 2 जानेवारी 2017

पिंपरी : एकीकडे राज्यातील सार्वत्रिक महापालिका निवडणुकांचा बिगूल काही दिवसात वाजणार असताना, पिंपरी-चिंचवड महापालिकेला मात्र या धामधुमीतही औटघटकेचा विरोधी पक्षनेता मिळणार आहे.

विद्यमान विरोधी पक्षनेते आणि कॉंग्रेसचे नगरसेवक राहुल भोसले यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नुकताच प्रवेश केल्याने हे पद रिक्त झाले आहे. निम्या कॉंग्रेस नगरसेवकांनी पक्षांतर केल्याने आता शिवसेना हा सर्वाधिक सदस्य असलेला विरोधी पक्ष राहिला आहे.त्यामुळे विरोधी पक्षनेते आपसूकच त्यांना मिळणार असून त्यांच्या गटनेत्या सुलभा उबाळे यांची या पदावर नियुक्ती होण्याची दाट शक्‍यता आहे. 

कॉंग्रेस आणि शिवसेना यांचे प्रत्येकी 14 नगरसेवक होते. नुकत्याच कॉंग्रेसच्या सात सदस्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची वाट धरली. त्यात भोसले यांचाही समावेश आहे. या सभागृहाचा कार्यकाळ मार्च महिन्यापर्यंत आहे. त्यामुळे दोन महिन्यांसाठी का होईना, हे पद भरण्याची कार्यवाही पालिकेच्या नगरसचिव कार्यालयाने सुरू केली आहे. येत्या बुधवारी (ता.4) होणाऱ्या पालिकेच्या शेवटच्या सर्वसाधारण सभेत या निवडीची घोषणा महापौर सौ. शकुंतला धराडे करण्याची शक्‍यता आहे. विरोधी पक्षनेतेपद भरण्याचा अधिकार पालिका आयुक्तांचा आहे. मात्र, ते सध्या रजेवर आहेत. त्यामुळे नगरसचिव विभागाला याबाबत कार्यवाही करण्यास सांगितल्याची माहिती महापौरांनी दिली आहे. तसेच आयुक्त दिनेश वाघमारे यांचा पदभार अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांच्याकडे असल्याने ते ही कार्यवाही पूर्ण करू शकतात, असेही त्यांनी सांगितले. 

असाही योगायोग 
राजीनामा दिलेले राहुल भोसले यांचे वडील हनुमंतराव भोसले महापौर होते. त्यावेळी सौ. उबाळे या विरोधी पक्षनेतेपदी होत्या. 

आता राहुल हे विरोधी पक्षनेतेपदावरून दूर होत असताना त्या पदावर पुन्हा उबाळे रुजू होण्याचा दाट संभव आहे. या नियुक्तीने महापौर, विरोधी पक्षनेते, सत्ताधारी राष्ट्रवादी आणि विरोधी भाजपच्या गटनेत्या, तसेच बहुतांश विविध समिती सभापती आणि प्रभाग अध्यक्षही महिलांच्या रूपाने पालिकेतील महिलाराज 2016 हे वर्ष आणि 2012 ची टर्म संपतानाही कायम राहिले आहे.

Web Title: Shiv Sena to get LoP in Pimpri Chinchwad Municipal Corporation