esakal | शिवसेना सभापतीचा सिंहगडमध्ये हॉटेलवर सशस्त्र हल्ला; महिलांनाही मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

एटीएम सुरक्षा रक्षकाला मारहाण करणारे अटकेत

शिवसेना सभापतीचा सिंहगडमध्ये हॉटेलवर हल्ला; महिलांनाही मारहाण

sakal_logo
By
निलेश बोरुडे

किरकटवाडी: खेड (जि.पुणे) पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान नारायण पोखरकर यांनीसिंहगड परिसरातील खडकवासला गावच्या हद्दीत एका हॉटेलवर हल्ला केला. आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून राजकीय वादातून त्यांनी 40 ते 50 गुंडांसह गोळीबार करत सशस्त्र हल्ला केला. खेड पंचायत समितीच्या महिला व पुरुष सदस्यांना तसेच महिला सदस्यांच्या पतींना गंभीर दुखापत झाली आहे. यामुळे हवेली पोलिसांच्या नाकाबंदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान राजकीय वादातून ही गंभीर घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. (Shiv Sena Khed Panchayat Samiti chairperson with 40 to 50 goons firing on hotel in Sinhagad area)

घटनास्थळी, अक्षरशहा रक्ताचा सडा पडला असून यामध्ये सुनिता संतोष सांडभोर, वैशाली गणेश जाधव, सुभद्रा विष्णु शिंदे, मंदा सखाराम शिंदे, वैशाली संतोष गव्हाणे, सखाराम शिंदे, संतोष सांडभोर व प्रसाद काळे यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा: दिलासादायक! पुणे शहरात दहा दिवसांत चार हजार खाटा झाल्या रिकाम्या

शिवसेनेच्याच असलेल्या खेड पंचायत समिती सदस्या सुनिता संतोष सांडभोर यांनी खेडचे प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांच्याकडे 24 मे रोजी विद्यमान सभापती भगवान नारायण पोखरकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यासंदर्भात दिनांक 31 मे 2021 रोजी मतदान होणार आहे. अगोदरच गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सभापती भगवान पोखरकर यांच्या दहशतीला घाबरून खेड पंचायत समितीतील शिवसेनेचे सहा सदस्य, भारतीय जनता पार्टीचा एक सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चार सदस्य सिंहगड परिसरातील खडकवासला गावच्या हद्दीत असलेल्या एका हॉटेलवर परिवारासह येऊन थांबले होते. काल रात्रीपासूनच भगवान पोखरकर हे गुंडांसह या सर्व सदस्यांचा पाठलाग करत होते. आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास भगवान पोखरकर व त्यांच्यासोबत असलेल्या गुंडांनी हॉटेलच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करत हॉटेलमध्ये प्रवेश केला. हॉटेलमध्ये असलेल्या रूमचे दरवाजे तोडून महिला पंचायत समिती सदस्य व त्यांच्या पतींना कोयते, गज व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. यावेळी भगवान पोखरकर यांनी सखाराम शिंदे, संतोष सांडभोर व प्रसाद काळे यांचे अपहरण करून त्यांना जबर मारहाण करून नांदेड-शिवणे पुलाजवळ सोडून दिले. तसेच भगवान पोखरकर यांचा भाऊ जालिंदर पोखरकर याने पिस्तुलने हवेत गोळीबार केल्याचेही सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे.

घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांच्या सूचनेनुसार अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, हवेली उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे पाटील, उपाधीक्षक राहुल आवारे, हवेली, पौड व वेल्हे पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. याप्रकरणी हवेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हेही वाचा: खासगी बसने येणाऱ्यांचे आता होणार स्क्रिनींग

हवेली पोलिसांची नाकाबंदी काय करत होती?

रात्रीच्या वेळी संचारबंदी असताना भगवान पोखरकर व त्यांच्या सोबत आलेले गुंड शस्त्रांसह हवेली पोलिस ठाण्याच्या हद्दीत मुक्तपणे फिरत होते. नांदेड फाटा व खडकवासला धरण चौक या ठिकाणी हवेली पोलिसांची नाका-बंदी नेमकी काय करत होती? असा प्रश्न उपस्थित होत आहे. हल्ला करून हल्लेखोर निघूनही गेले तरी हवेली पोलिसांना याचा सुगावा लागला नाही.