
देविदास वायदंडे यांनीही विद्यापीठात ठराविक लोकांना महत्त्व मिळते यास दुजोरा दिला. प्राचार्य बाबासाहेब सांगळे यांनीही सर्व ठिकाणी काहीजण दिसतात, इतरांनाही संधी दिली पाहिजे असे सांगितले.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दोन-तीन लोकांची चलती आहे, इतर कोणाचेही ऐकले जात नाही, अशी चर्चा कायम सुरू असते, पण गुरुवारी (ता.२५) थेट त्यावर अधिसभेत आरोप प्रत्यारोप झाले.
"विद्यापीठात सर्व कामाची जबाबदारी व्यवस्थापन सदस्य राजेश पांडे यांनाच दिली जात असून, अर्थसंकल्प ही तेच मांडणार आहेत, ते भाजपचेही काम करतात. इतर सदस्यांना संधी का दिली जात नाही, अशी टीका शिवसेनेचे अधिसभा सदस्य अमित पाटील यांनी केल्याने अधिसभेत शिवसेना-भाजप संघर्ष बघायला मिळाला. मात्र, सदस्यांनी पांडे यांची बाजू लावून धरली. तेव्हा पांडे यांनी प्रयत्न करणाऱ्यांना कायम संधी मिळेल, असा टोला लावत या प्रकरणावर पडदा टाकला.
- 'या'मुळे पुण्यात वाढली कोरोनाची रुग्णसंख्या; आरोग्य अधिकाऱ्यांनीही केलं मान्य!
विद्यापीठाची अधिसभा ऑनलाईन होत असली तरी सदस्यांच्या आरोप प्रत्यारोपामुळे प्रत्यक्ष सभेचाच भास होत होता. अमित पाटील यांनी विद्यापीठात विशिष्ट लोकांना महत्त्व दिले जात आहे, बाकी सदस्यांना गृहीत धरले जाते. विद्यापीठाच्या वृक्षारोपणाच्या उपक्रमात, प्रसार माध्यमात बोलायला, ऑनलाईन कार्यक्रमात, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमात राजेश पांडेच दिसतात. त्यांच्याकडे भाजपची, एमएनजीएलची जबाबदारी आहे, आता विद्यापीठाचा अर्थसंकल्पही तेच मांडणार आहेत. एकाच व्यक्तीकडे किती जबाबदारी देता, इतर सदस्यांनाही कुलगुरूंनी संधी दिली पाहिजे. विद्यापीठाचा अर्थसंकल्प तज्ज्ञांद्वारे मांडला जावा, असाही सल्ला पाटील यांनी दिला. तसेच परीक्षेच्या मुद्द्यावरून पुणे विद्यापीठाच्या भूमिकेवर टीका केली.
- #BoycottChina : अख्ख्या गावानेच केलाय चिनी उत्पादनांचा बहिष्कार; कोणतं आहे हे गाव?
पाटील यांच्या या राजकीय आणि टीकात्मक वक्तव्याचे पडसाद अधिसभेत उमटले, कुलगुरूंनी परीक्षेच्या वक्तव्यावर खुलासा करत शासनाच्या आदेशानुसार काम सुरू होते असे सांगितले. तर, गिरीश भवाळकर यांनी अधिसभेत राजकीय विषय उपस्थित करणे योग्य नाही, याचे तारतम्य ठेऊन वक्तव्य केले पाहिजे. तसेच पांडे हे राज्यपाल नियुक्त सदस्य आहेत. यात भाजप, अभाविपचा विषय काढू नये. अर्थसंकल्प कोणी मांडावा हा विषय अध्यक्ष ठरवतात असे सांगून पाटील यांचे आरोप खोडून काढले. तसेच राजकीय लोकांची नावे घेऊ नयेत असेही सांगितले. त्यावर पाटील यांनी पुन्हा आपला मुद्दा लावून धरून आदित्य ठाकरे विद्यार्थ्यांसाठी भूमिका मांडतात, त्यांचे नाव घेणार असे सांगितले. त्यानंतर पाटील यांनी सभात्याग केला.
- पुण्यात आत्महत्यांचे सत्र सुरूच; प्रसिद्ध हॉटेल चालकाने घेतला गळफास
दरम्यान, देविदास वायदंडे यांनीही विद्यापीठात ठराविक लोकांना महत्त्व मिळते यास दुजोरा दिला. प्राचार्य बाबासाहेब सांगळे यांनीही सर्व ठिकाणी काहीजण दिसतात, इतरांनाही संधी दिली पाहिजे असे सांगितले. इतर सदस्यांनीही विद्यापीठात राजकीय विषय आणू नये अशी भूमिका घेतली.
अर्थसंकल्प मांडताना राजेश पांडे यांनी विद्यापीठ हे राजकारणापलिकडे आहे. येथे वैचारिक दृष्टीकोन ठेऊन काम केले जाते. पक्ष, संघटनेचा इथे संबंध न आणता सर्वजण एकत्र काम करतात. गेल्या २४ वर्षात मी ९ वेळा पुणे विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विद्यापीठाचा अर्थसंकल्प मांडला आहे असे सांगितले. तसेच विद्यापीठात प्रत्येकाला काम करण्याची संधी मिळते, त्यासाठी कल्पना मांडावी लागते, पुढाकार घेऊन उपक्रम सुरू करावा लागतो, असेही सांगितले.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा