esakal | पुणे : 'पीएमआरडीए’त शिवसेनेचा वरचष्मा
sakal

बोलून बातमी शोधा

PMRDA

पुणे : 'पीएमआरडीए’त शिवसेनेचा वरचष्मा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यातील ८०० गावे आणि नगर परिषदांच्या विकासासाठी महत्त्वाचे निर्णय घेणाऱ्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) नव्या नियोजन समितीमध्ये शिवसेनेचाच (shivsena) वरचष्मा झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या समितीचे अध्यक्ष आहेत. याशिवाय समितीत शिवसेनेचे खासदार आणि ठाकरे यांचे निकटवर्तीय संजय राऊत (sanjay raut) यांच्यासह खासदार श्रीरंग बारणे (shrirang barane), आमदार तानाजी सावंत (tanaji sawant) यांचीही वर्णी लागली आहे. राष्ट्रवादी व काँग्रेसचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी यात आहेत. मात्र, या समितीमध्ये पालकमंत्री अजित पवार (ajit pawar) आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट (girish bapat) यांना मात्र दूर ठेवले आहे. (Shiv Sena supremacy in pune PMRDA)

राज्यात भाजपचे सरकार असताना ‘पीएमआरडीए’ची (PMRDA) स्थापन झाली. त्यावेळी ‘पीएमआरडीए’चे पहिले अध्यक्ष तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट हे होते. कालांतराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांच्याकडे अध्यक्षपद गेले तरी बापट यांचा समितीमध्ये समावेश होता. ‘पीएमआरडीए’तील २३ गावे पुणे महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर या गावांचा ‘डीपी’ महापालिकेला न करू देता ‘पीएमआरडीए’च करणार असा निर्णय घेतल्याने राजकारण सुरू झाले आहे. असे असतानाच महाविकास आघाडी सरकारने नव्या सदस्यांची नियुक्ती केली. त्यात भाजपला स्थान दिले नसल्याने भाजपने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: 'बुलेट ट्रेन’चा प्रवास पुणे जिल्ह्यातील सात तालुक्यांतून

या समितीमध्ये पुण्याबाहेरील राज्यसभेचे खासदार संजय राऊत, आमदार तानाजी सावंत यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या समितीमध्ये मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेचे दोन खासदार, एका आमदाराचा समावेश असल्याने ‘पीएमआरडीए’च्या संपूर्ण नियोजनात शिवसेनेचे वर्चस्व असणार आहे. २३ गावांचा डीपी आता ‘पीएमआरडीए’ करणार असल्याने या नवीन सदस्यांमध्ये विद्यमान खासदार बापट, पुण्याचे महापौर यांना स्थान का नाही असा प्रश्न भाजपने उपस्थित केला आहे. शहर व जिल्ह्यातील भाजपच्या आमदारांना जाणीवपूर्वक डावलले आहे.

पुण्याशी संबंध नसणारे खासदार राऊत, आमदार सावंत यांची नियुक्ती करून पुणेकरांचा अपमान केला आहे, अशी टीका भाजपने केली आहे. इतर सदस्यांमध्ये खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे यांच्यासह पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त, नगर परिषदांचे प्रतिनिधी व इतर विभागातील अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा: पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आता ८ ऑगस्टला

याबाबत भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले, ‘‘पीएमआरडीएचा ज्यांचा काहीच संबंध नाही, असे शिवसेनेचे संजय राऊत, तानाजी सावंत यांची या समितीमध्ये नियुक्ती केली, पण पुण्याचे खासदार गिरीश बापट, इतर आमदार, महापौर यांची नियुक्ती केली नाही. महाविकास आघाडी सरकारकडून पक्षपाती निर्णय घेतला गेल्याने देवेंद्र फडणवीस यांच्या काळात पीएमआरडीएकडून सुरू झालेल्या मेट्रो, रिंगरोड यासारख्या मोठ्या प्रकल्पांना खीळ बसण्याची शक्यता आहे."

loading image